तीन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या सायना नेहवाल हिने इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. मात्र भारताचे अन्य खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत व पारुपल्ली कश्यप यांना सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.
या स्पर्धेत २००९, २०१० व २०१२ मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या सायना हिने थायलंडच्या पोर्नतीप बुरानाप्र्सत्सुक हिला २१-१५, २१-१० असे सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले. ऑलिम्पिक विजेत्या सायनाला पुढच्या फेरीत स्कॉटलंडच्या किस्र्टी गिल्मोर हिच्याशी खेळावे लागणार आहे. गिल्मोर हिने जपानच्या सायका ताकाहाशी हिला २१-१९, १९-२१, २२-२० असे चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले.
दहावी मानांकित सिंधू हिला ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती खेळाडू यिहान वाँग या चीनच्या खेळाडूविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. हा सामना तिने २४-२६, १७-२१ असा गमावला.
पुरुषांच्या एकेरीत कश्यप याला चौथ्या मानांकित केनिची तागो याने १९-२१, २१-८, २४-२२ असे हरविले. पहिली गेम कश्यपने जिंकली, मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याने सपशेल निराशा केली. तिसऱ्या गेममध्ये त्याला सूर गवसला. तथापि तागो याने अनुभवाचा फायदा घेत ही गेम जिंकून सामन्यातही विजय मिळविला. चीनच्या चेन युकुन याने श्रीकांत याच्यावर २१-१२, १७-२१, २१-१६ अशी मात केली. श्रीकांत याने दुसरी गेम घेत सामन्यात रंगत आणली, मात्र निर्णायक गेममध्ये तो प्रभाव दाखवू शकला नाही.
सौरभ वर्मा याला पात्रता फेरीतच इंडोनेशियाच्या विष्णु युली प्रासेत्यो याच्याकडून १३-२१, २१-१९, १६-२१ असे पराभूत व्हावे लागले. एच. एस. प्रणय याला इंडोनेशियाच्या अलमसिया युनुस याने २२-२०, २२-२० असे हरविले.
मिश्रदुहेरीत भारताच्या तरुण कोना व अश्विनी पोनप्पा यांना जर्मनीच्या पीटर केस्बेऊर व इसाबेल हर्चिच यांनी २१-१९, १४-२१, २१-१९ असे पराभूत केले.

Story img Loader