गतविजेती सायना नेहवाल, एच.एस.प्रणय आणि के.श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने आपल्या अव्वल मानांकनाला साजेसा खेळ करीत इंडोनेशियाच्या फेबी अँगुनी हिच्यावर २१-१२, २१-११ अशी लीलया मात केली. तिने केवळ अध्र्या तासाच्या खेळात ड्रॉपशॉट्स व स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार उपयोग केला. तिला आता आठव्या मानांकित जुआन गुओ या सिंगापूरच्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जुआन हिने आपलीच सहकारी झिओयु लियांग हिच्यावर २१-१३, २१-११ असा विजय संपादन केला.
पुरुषांच्या एकेरीत प्रणयने पहिला गेम गमावल्यानंतर स्मॅशिंगच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत आपलाच सहकारी आनंद पवार याला पराभूत केले. हा सामना त्याने १९-२१, २१-१३, २१-१५ असा जिंकला. पवार याला दहावे मानांकन देण्यात आले होते. तेराव्या मानांकित श्रीकांत याने दक्षिण कोरियाच्या हुआंग जोंग सुओ याचा २१-१९, २१-१५ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. त्याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला.
भारताच्या बी. साईप्रणित याला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या विष्णू युली प्रसेत्यो याने चुरशीच्या लढतीनंतर त्याच्यावर २१-१८, १६-२१, २१-१९ असा रोमहर्षक विजय नोंदविला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा