वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांनी पटकावला आहे. ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा दुबई येथे होणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच प्रकारांत होणाऱ्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंनाच खेळण्याची संधी मिळते.
२०११ मध्ये सायना या स्पर्धेत सहभागी झाली होती तर गेल्यावर्षीही श्रीकांत या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. मात्र दोघांनाही जेतेपदापर्यंत वाटचाल करता आलेली नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असल्याने या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा सायनाचा मार्ग सुकर झाला.
यंदाच्या वर्षांत सायनाने इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. एका देशाच्या दोनच खेळाडूंना खेळण्याची संधी असा नियम असल्याने चीनतर्फे लिन डॅन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला चेन लाँग हे पात्र ठरले. मात्र जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या तिआन होऊवेईचा मार्ग बंद झाला. मात्र याचा फायदा श्रीकांतला झाला आणि क्रमवारीत नवव्या स्थानी असूनही तो स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरला.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांची पात्र ठरण्याची संधी दोन स्थानांनी हुकली. ही जोडी क्रमवारीत दहाव्या स्थानी होती. पुरुष तसेच मिश्र दुहेरी प्रकारात एकही भारतीय जोडी पात्र ठरू शकली नाही.