सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि पी.सी. तुलसी यांनी ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सहाव्या मानांकित सायना हिने पहिल्या फेरीत चीनच्या सुआन युओ हिच्यावर २२-२४, २१-१७, २१-१० असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. तुलसी हिने अमेरिकेच्या जेमी सुबंधी हिच्यावर २१-१६, २१-१८ असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळविला. आठव्या मानांकित सिंधू हिने जपानच्या अया ओहोरी हिच्यावर २१-१६, २१-१४ अशी मात केली. हा सामना तिने केवळ ३१ मिनिटांमध्ये जिंकला. तिला आता थायलंडच्या निचाओन जिंदापोन हिच्याशी खेळावे लागणार आहे.
सायनाला सुआनविरुद्ध विजयसाठी झगडावे लागले. रंगतदार झालेला हा गेम सायनाने गमावला. २२-२२ अशा बरोबरीनंतर सुआन हिने स्मॅशिंगच्या फटक्यांचा सुरेख खेळ करीत दोन गुण घेत हा गेम घेतला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सायना हिने ८-० अशी भक्कम आघाडी घेत सुरुवात केली. सुआन हिने झुंज देत १३-१३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. हा गेम सायनाने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्ये मात्र सायना हिने ऑलिम्पिक कांस्यपदकाला साजेसा खेळ केला व विजयश्री खेचून आणली.
पुरुषांच्या एकेरीत बी. साईप्रणीत याने स्थानिक खेळाडू होईकीत ओन याचा २१-७, २१-११ असा दणदणीत पराभव केला. मात्र त्याचा सहकारी एच. एस. प्रणय याला जर्मनीच्या मार्क जेवीब्लर याच्याकडून १४-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. पुरुषांच्या दुहेरीत प्रणव चोप्रा व अक्षय देवलकर यांनी सिंगापूरच्या योंगकाई तेरीही आणि झिलियांग देरेक वोंग यांना २१-१६, २१-१६ असे हरविले. भारताच्या मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांना सातव्या मानांकित हेफेंग फुओ व नान जियांग यांनी २१-१७, २१-११ असे हरविले.
मिश्रदुहेरीत अरुण विष्णू व अपर्णा बालन यांना स्थानिक खेळाडू रॉस स्मिथ व रेणुगा वीरान यांनी २३-२१, २०-२२, २४-२२ असे हरविले. द्वितीय मानांकित चेन झुओ व जिना माए यांनी मनु अत्री व सिक्की रेड्डी यांचा २१-१७, २१-१६ असा पराभव केला. अक्षय देवलकर व प्रज्ञा गद्रे यांनाही पराभवाचा धक्का बसला. हाँगकाँगच्या युआन लुंगचान व ियग सुएतत्से यांनी त्यांच्यावर २१-१६, २१-१४ अशी मात केली. गद्रे-सिक्की रेड्डी जोडीला महिलांच्या दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. आठव्या मानांकित पिआ झेबादियाह बेर्नादेथ व रिझकी अ‍ॅमेली प्रदीप्ता यांनी त्यांना २१-१७, १९-२१, २१-१० असे हरविले.

Story img Loader