ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना साखळीतच कडव्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. मागील १८ वर्षे ऑल इंग्लंडचे जेतेपद भारताला हुलकावणी देत असून या वेळी ते पटकावण्यासाठी भारताची प्रमुख मदार पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांच्यावर आहे.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूसमोर पहिल्याच फेरीत दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्य़ुंगचे आव्हान असणार आहे. तर २०१५च्या उपविजेत्या सायनाची स्कॉटलंडच्या कस्र्टी गिल्मोरशी गाठ पडणार आहे. ६ मार्चपासून यंदाच्या ऑल इंग्लंड स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यानंतर सिंधू व सायनाची वाट अधिकच बिकट होणार आहे. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील ह्य़ुंगविरुद्धच्या पराभवाचा बदला घेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास सिंधूला चेन युफेईचा सामना करावा लागणार आहे.

सायनाला उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या चायनीज तैपईच्या ताई झू यिंगसारख्या मातब्बर खेळाडूचा मुकाबला करावा लागणार आहे.

Story img Loader