सायना नेहवाल हीच माझ्यासाठी प्रेरणास्थान असून प्रत्यक्ष कोर्टवरील तिचा खेळ पाहिल्यावर माझा उत्साह वाढतो, असे भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने सांगितले. सिंधू हिने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली झुईरुई हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता.
सायनाने आतापर्यंत ऑलिम्पिक कांस्यपदकाबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत तसेच तिने अनेक सुपर सीरिजमध्येही अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. तिच्यासारखेच यश मला मिळवायचे आहे असे सांगून सिंधू म्हणाली, यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. सईद मोदी ग्रां. प्रि. स्पर्धेत झुईरुईवर मी मात करू शकेन याची मला खात्री नव्हती. तथापि हा सामना जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला. मात्र अंतिम फेरीत मी विजय मिळवू शकले नाही याचे मला खूप दु:ख झाले. या सामन्यात लिंडावेनी फानेत्रीविरुद्ध मी चांगली सुरुवात केली होती. मात्र नंतर माझे स्मॅशिंगचे फटके नेटमध्ये गेले व सामना मला गमवावा लागला. हे अपयश धुवून काढण्याचे माझे ध्येय आहे. या आठवडय़ात कोरियन ओपन स्पर्धा होत असून तेथे विजेतेपद मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रामुख्याने परतीच्या फटक्यांबाबत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मी कसून सराव करीत आहे.
सिंधूने गतवर्षी १९ वर्षांखालील गटात आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. सायनानंतरची अव्वल दर्जाची महिला बॅडमिंटनपटू म्हणून सिंधूकडे पाहिले जात आहे. सायनाची परंपरा पुढे ठेवण्यासाठी मी खूप कष्ट घेत आहे असे सिंधूने सांगितले.