ज्ञानेश भुरे
सलीम दुराणी..! भारतीय क्रिकेटमध्ये एक आदराने घेतले जाणारे नाव. कुणालाही आवडेल असे सलीम दुराणींचे व्यक्तिमत्त्व. खऱ्या अर्थाने अष्टपैलू म्हणता येईल, असे हे व्यक्तिमत्त्व होते. क्रिकेटपटू, अभिनेता अशा दोन्ही आघाडय़ांवर ते सहज खेळून गेले. पण, अधिक रमले ते क्रिकेटच्या मैदानावर. क्रिकेटचे मैदान हे त्यांचे व्यासपीठ..बॅट आणि बॉल हे त्यांचे सहकलाकार. चित्रपटात सलीम दुराणींनी परवीन बाबीबरोबर ‘चरित्र’ या चित्रपटात काम केले. पण, क्रिकेटच्या मैदानावर त्यांना कधी नायिकेची साथ घ्यावी लागली नाही. सलीम यांची साथ मिळावी म्हणून जणू बॅट आणि बॉल सलीम हे मैदानावर येण्याची वाट पाहायचे. त्यांचे नाते इतके घट्ट होते की विचारू नका. ते केवळ वार्धक्याने तुटले. मैदानावर नाबाद खेळी करता येते, पण आयुष्याच्या व्यासपीठावर कुणीच असे वरदान घेऊन येत नाही.
सलीम दुराणी म्हणजे खरेच एक देखणा क्रिकेटपटू. स्टेडियममध्ये लांबून जरी पाहिले तरी खेळाडूंच्या गर्दीत ते लगेच ओळखू यायचे. मुंबईच्या क्रिकेटवेडय़ांपैकी सलीम एक क्रिकेटवेडे. त्यांनी मुंबईच्या रक्तातले क्रिकेट अनुभवले होते. त्यात ते सामावून गेले होते. आपल्या फटकेबाजीने त्यांनी मैदानावरून निवृत्ती घेईपर्यंत प्रत्येकाला क्रिकेटचा आनंद भरभरून दिला. प्रेक्षकांतून ‘वुई वाँट सिक्सर..’ अशी साद आली की पुढचा चेंडू प्रेक्षकांमध्ये गेलाच म्हणून समजा, इतकी त्यांची हुकूमत होती. चाहत्यांना कधी निराश करायचे नाही हीच सलीम यांची कायम धारणा असायची. त्यामुळेच क्रिकेटचे मैदान असो किंवा मैदानाबाहेर सलीम यांनी कायम प्रत्येकाला आनंदच दिला. आपल्याला काय कमी पडते किंवा कमी पडणार आहे याची काळजी त्यांनी कधीच केली नाही. मैदानावर ज्याप्रमाणे बॅट सलीम यांच्या हातात असायची, तशीच मैदानाबाहेर गेल्यावर सिगारेट आणि दारू. वार्धक्याने बॅट सुटली, पण सलीम यांची सिगारेटची सवय काही सुटली नाही. अंगभूत देखणेपणामुळे सलीम यांनी पडद्यावर चमकण्याचा प्रयत्न केला, पण ते क्रिकेटच्या मैदानावरच अधिक चमकले.
अभिनेत्यांमधील त्यांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा सांगितला जातो – चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींनी आयोजित केलेल्या एका सामन्यात सलीम झोकात खेळत होते. खेळ रंगात आला असतानाच दिलीपकुमार यांनी झेल घेतल्यामुळे सलीम बाद झाले. तेव्हा राजकपूर यांचे वाक्य होते, दिलीप साब, आप पडदे के हिरो है लेकिन ये मैदान का हिरो है, आप के जैसा बडा कलाकार है, ये सब लोक आपको नही इनका खेल देखने आए थे..असेच प्रेम सलीम यांनी प्रत्येकाच्या मनात मिळवले होते. असाच आणखी एक किस्सा म्हणजे १९७३ मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा आठवतो. कानपूर कसोटीत भारताने सलीम यांना संघातून वगळले होते. तेव्हा मैदानावर उपस्थित सलीम यांच्या पाठीराख्यांनी नो सलीम..नो टेस्ट..असे फलक झळकावले होते.
सलीम कमालीचे मनमौजी होते. त्यांनी जगण्याशी कधीच तडजोड केली नाही. ते आपले आयुष्य बिनधास्त जगले. पत्नीच्या निधनानंतर सलीम यांनी आपले मस्जिद बंदर येथील घर सोडले. नंतर ते मुंबईला क्वचित दिसले. वार्धक्याने त्यांना घेरले होते. शारीरिक व्याधींनी ते त्रस्त झाले होते. मैदानावर कधीही शरणागती न पत्करणाऱ्या या पठाणाने वाढत्या वयासमोर मात्र शरणागती पत्करली होती. पण, जगण्याची शैली तशीच होती. मुक्त..बिनधास्त.