Salman Butt: आशिया कप २०२३ला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानी भूमीवर खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ श्रीलंकेतील कॅंडी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मालिकेला सुरुवात करेन. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये २०२३चा वर्ल्डकप भारतात होणार आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या टुर्नामेंटपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने दोन्ही संघांबाबत आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे.

सलमान बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “सध्या प्रयोग करण्याची ही वेळ नाही. यापैकी कोणताही संघ २०००च्या दशकातील ऑस्ट्रेलियासारखा नाही, जो एका रात्रीत काहीही करू शकला आणि तरीही जिंकला. तुम्ही नवीन खेळाडू उतरवणार आणि सामने जिंकणार किंवा तुम्ही जुने विजेते खेळाडू खेळवणार आणि तरीही जिंकणार. दोन्ही परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे संघ त्या संघासारखे नाहीत आणि त्यांना ते माहित आहे. तरीही हा प्रयोग करण्याचा अट्टहास का?” असा संतप्त सवाल त्याने केला.

बट्ट पुढे म्हणाला, “ते (भारत आणि पाकिस्तान) अशा संघांशी स्पर्धा करत आहेत जे त्यांच्या सामन्याच्या दिवशी धोक्याचे ठरू शकतात. ऑस्ट्रेलिया या सगळ्यात खूप पुढे निघून गेला आहे. जरी त्यांनी लवकर पाच विकेट्स गमावल्या तरीही ते एका डावात २७५-३०० धावा करू शकतात. ऑस्ट्रेलिया हे ड्रीम युनिट होते आणि अजूनही आहे. भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकासाठी ड्रीम युनिट नाहीत आणि त्यांना ते माहित असूनही त्यावर काम करत नाहीत, हे खूप मोठं दुर्दैव आहे.”

हेही वाचा: AFC League: नेयमार पहिल्यांदाच भारतीय भूमीवर खेळणार, पुण्याच्या AFC चॅम्पियन्स लीगमध्ये दिसणार स्टार फुटबॉलपटूचा जलवा!

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चमकदार होती

पाकिस्तानचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, “एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताची फलंदाजी उत्कृष्ट होती. सध्या, त्यांना एक फ्लो व्यवस्थित ठेवावा लागेल, जर रोहित किंवा कोहलीने मोठी धावसंख्या केली नाही तर भारताच्या गोलंदाजांसमोर खूप अडचणी निर्माण होतील. तशीच परिस्थिती पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर येऊ शकते.”

स्पर्धेतील पहिला सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.

हेही वाचा: Neeraj Chopra: एकच वादा नीरज दादा! पहिल्याच फटक्यात गाठली फायनल अन् ऑलिम्पिकचे तिकीट केलं कन्फर्म

भारताचे वेळापत्रक

भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.

Story img Loader