चेन्नईत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या पाचव्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सचा पाच गडी राखत पराभव केला. आयपीएलच्या या हंगामातील चेन्नई सुपरकिंग्जला हा सलग दुसरा विजय ठरला. अटीतटीच्या या सामन्यात प्रत्येक क्षणाला सामन्याचं रुप बदलत होतं. अखेर चेन्नईने हा सामना जिंकला. या विजयाचा खरा हिरो ठरला तो सॅम बिलिंग्स. बिलिंग्सने २३ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या या दमदार खेळीत त्याने दोन चौकार आणि पाच षटकार लगावले. आपल्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला. आपल्या या विजयी खेळीसोबत बिलिंग्सने शाहरुख खानची विजयाची पावती मात्र फाडून टाकली असंच म्हणावं लागेल.
चेन्नई सुपरकिंग्ज हा सामना आपल्या घऱच्या मैदानावर खेळत होती. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. दोन वर्षानंतर पुनरागन करणारी चेन्नई संघ या हंगामातील दुसरा सामना घरच्या मैदानावर खेळत होती. याआधी चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जखमी असल्याने केदार जाधव आणि मार्क वूडच्या जागी सॅम बिलिंग्स आणि शार्दूल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला होता.
आंद्रे रसलने तुफानी खेळी करत केलेल्या ८८ धावांच्या मदतीने कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नईसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. रसल फलंदाजीसाठी आला तेव्हा संघाची धावसंख्या ८९ वर ५ विकेट्स होती. मात्र रसलने कर्णधार दिनेश कार्तिकसोबत संघाचा डाव सावरला. रसलने फक्त ३६ चेंडूत ८८ धावा ठोकल्या. आपल्या या डावात त्याने ११ षटकार आणि एक चौकार लगावला. आयपीएलच्या या हंगामातील हा आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे.
कोलकाताने दिलेला धावांचा डोंगर पोखरुन चेन्नई विजय मिळवेल की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं. ओपनिंग फलंदाज शेन वॉट्सनने १९ चेंडूत ४२ धावा करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. २०३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. वॉट्सन आणि रायडूने अगदी संघाला हवी त्या पद्धतीने खेळी केली. शेन वॉट्सन (४२) आणि अंबाती रायडू (३९) पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. पॉवरप्ले संपण्याआधीच चेन्नईने ७५ धावा केल्या होत्या. यानंतर रैना, धोनी यांनीही ताबडतोब फलंदाजी केली. मात्र संघाला ख-या अर्थाने विजयाकडे घेऊन गेला तो सॅम बिलिंग्स. बिलिंग्सने २३ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी करत संघाला विजयाजवळ नेलं. यानंतर राहिलेलं काम रवींद्र जाडेजा आणि ब्रावोने पार पाडत संघाला विजय मिळवून दिला.