मेलबर्न : भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी मी कमालीचा उत्सुक असून, बुमरा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळण्यासाठी मी स्वतंत्र योजना केली आहे, असा विश्वास चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्सटासने व्यक्त केला. वयाच्या १९व्या वर्षी कोन्सटासला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे नेथन मॅकस्वीनी अपयशी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता अंतिम अकरात स्थान मिळाल्यास आपण निवड सार्थ ठरविण्यासाठी सज्ज आहोत, असे कोन्सटास म्हणाला.
हेही वाचा >>>IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम पत्रकार परिषदेला सामोरे जातानाही त्याच्यावर कसलेच दडपण नव्हते. त्याने अगदी सहज पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘‘माझी वाटचाल खूप चांगली सुरू आहे. माझा स्वत:च्या क्षमतेवर खूप विश्वास आहे. भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी माझ्याकडे स्वत:च्या अशा योजना आहेत. मला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल. अशी आशा वाटते,’’ असे कोन्सटासने सांगितले.