Sam Curran Brother: इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि त्याचा भाऊ टॉम करन हे दोघेही इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळतात. दोन्ही भावांनी इंग्लंड क्रिकेटसाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यादरम्यानच आता या दोघांचा दुसरा भाऊ बेन करन हा दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. बेन करनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे.
सॅम करन, टॉम करन आणि त्यांचा मधला भाऊ बेन करन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळले होते. बेन करन २०२२ पर्यंत काऊंटी क्रिकेट संघ नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळला आहे, परंतु त्यानंतर तो झिम्बाब्वेला गेला. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी चमकदार कामगिरी केली आहे. प्रो-५० चॅम्पियनशिप २०२४/२५ आणि लोगान कप २०२४/२५ प्रथम श्रेणी टूर्नामेंटमध्ये तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे त्याची झिम्बाब्वे राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० आणि वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचे यजमानपद झिम्बाब्वे संघाकडे असणार आहे. मात्र, बेनची केवळ वनडेसाठीच निवड झाली आहे. तो टी-२० संघाचा भाग नसेल. झिम्बाब्वे क्रिकेटने एका निवेदनात लिहिले की, २८ वर्षीय करनने देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीनंतर संघात आपले स्थान निर्माण केले आहे. तो माजी झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक दिवंगत केविन करन यांचा मुलगा आणि इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू टॉम आणि सॅम करनचा भाऊ आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ
टी-२० संघ
सिंकदर रझा (कर्णधार), फराज अकरम, ब्रायन बेनेट, रयान बर्ल, ट्रेवर ग्वांडू, ताकुदज्वानाशे काइतानो, वेस्ली मधेवेरे, टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मारूमणी, वेलिंग्टन मसाकदझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजारबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमन न्यामुरी
वनडे संघ
क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, बेन करन, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेव्हर ग्वांडू, टिनोटेंडा माफोसा, तादिवनाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामौरी, व्हिक्टर न्याउची, सिकंदर रझा, शॉन विल्यम्स