Sam konstas Reveals Chat With Virat Kohli: ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चर्चेचा विषय ठरला. कॉन्स्टासने बुमराहबरोबर वाद घालण्यापूर्वी त्याचा पदार्पणाच्या सामन्यात विराट कोहलीबरोबर मैदानात वाद झाला होता. सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करत ६० धावांची खेळी केली होती. या सामन्यानंतर त्याने विराटशी वाद झाल्यानंतर काय चर्चा केली होती, हे सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियन डावाच्या १०व्या आणि ११व्या षटकांच्या ब्रेक दरम्यान, जेव्हा कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा स्ट्राईक बदलत होते, तेव्हा कोहलीही फिल्डिंगसाठी जागा बदलत होता आणि यादरम्यान चालता चालता कॉन्स्टास आणि विराट एकमेकांना धडकले. यानंतर कॉन्स्टास आणि विराट यांच्यात बाचाबाची झाली, ख्वाजाने तिथे येऊन हा वाद मिटवला. त्यावेळी समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही कोहलीने हे जाणूनबुजून केले, असे मत व्यक्त केले.
मैदानात झालेल्या या वादानंतर त्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट आणि कॉन्स्टास यांच्यात चर्चा झाली होती. कॉन्स्टास हा विराट कोहलीला त्याचा क्रिकेटमधील आदर्श मानतो. कॉन्स्टासने विराटच्या भेटीबाबत बोलताना न्यूज कॉर्पला सांगितले, त्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मी विराटची भेट घेतली आणि त्या चर्चेदरम्यान मी त्याला सांगितलं की, “विराट माझ्यासाठी आदर्श आहे. त्याचा खेळ पाहतच मी लहानाचा मोठा झालो. त्याच्या व्यक्तिमत्वाला एक खास वलय आहे पण तो अतिशय नम्र आहे. त्याच्याशी बोलताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याने मला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रिकेटविश्वातल्या महान खेळाडूंपैकी तो एक आहे.”
हेही वाचा – VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अॅक्शन कॉपी करण्याचा मोह
विराट कोहलीने कॉन्स्टासला पुढील मालिकेसाठी शुभेच्छा दिल्याचं त्याने सांगितलं. कॉन्स्टास म्हणाला, “विराटने मला पुढील मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. तो पुढे इतकंही म्हणाला की, तू चांगली कामगिरी आहेस तर कदाचित तुझी श्रीलंका मालिकेसाठी निवड होईल. माझं संपूर्ण कुटुंब विराटचा चाहता आहे आणि मी लहानपणापासून त्याला माझा आदर्श मानतो.”
विराट कोहली आणि कोन्स्टास यांच्यात वाद झाल्यानंतर कोन्स्टासने अप्रतिम खेळी खेळली. कॉन्स्टाने त्यात्या पहिल्याच खेळीत आपली छाप पाडली आणि त्याने थेट बुमराहविरुद्ध दोन षटकार लगावले. कॉन्स्टासने ६५ चेंडूत ६० धावांची खेळी खेळली. या संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डरने खूप निराश केले होते, परंतु कॉन्स्टासने चांगली फलंदाजी करत संघाला महत्त्वपूर्ण सुरूवात करून दिली होती.