Sam Konstas on Virat Kohli Shoulder Bump in BGT Video: ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टाससाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खूप खास ठरली. या खेळाडूने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आणि यासोबतच विराट कोहलीबरोबरच्या वादामुळेही तो प्रसिद्धीच्या झोतात आला. इतकंच नव्हे तर त्याने अखेरच्या कसोटीत थेट जसप्रीत बुमराहशी देखील वाद घातला. पण कोहलीबरोबरचा त्याचा वाद लक्ष वेधणारा ठरला. पण या वादाबाबत आता बोलताना कॉन्स्टास म्हणाला, कोहलीबरोबर झालेल्या वादाचा त्याला कोणताही पश्चाताप नाही.
मेलबर्न कसोटी सामन्यात पदार्पणाचा सामना खेळत असताना भारतीय फलंदाज विराट कोहलीने कॉन्स्टासला खांद्याने धक्का मारला होता. यानंतर कॉन्स्टास आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली होती. त्या घटनेबद्दल बोलताना कॉन्स्टास म्हणाला, “मला कोणतीही खंत नाही. माझ्यासाठी तो क्षण खूप खास होता. मी खोटं नाही बोलणार, पण तो व्हिडिओ मी अनेकदा पाहिला आहे. नेट्समध्ये सरावाला जातं अनेक मुलं ऑटोग्राफ घेण्यासाठी येतात छान वाटतं. कारण एकेकाळी मी देखील त्या मुलांच्या जागी होतो.”
कोन्स्टासने केवळ त्याच्या वादळी फलंदाजीच्या शैलीमुळेच नव्हे तर मैदानावरील त्याच्या उत्साही कृतींसाठी देखील प्रसिद्धीझोतात आला. तो कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह अनेक भारतीय स्टार्सशी वाद घालताना दिसला. नव्या खेळाडूसाठी असे वर्तन असामान्य असले तरी, कॉन्स्टासचा आत्मविश्वास आणि आक्रमकतेची तुलना चाहत्यांनी कोहलीशी केली. विराटही मैदानावर आक्रमकपणे खेळतो. पण या आक्रमकतेचं रूपांतर तो मोठ्या खेळींमध्ये देखील करतो.
मैदानावरील वादावादीमध्ये नेहमी सामील असणारा विराट कोहली अशा वादांचं मॅचविनिंग इनिंग्समध्ये बदलण्याचा इतिहास त्याच्या नावे आहे. विराट कोहलीचे फलंदाज म्हणून पहिले दोन ऑस्ट्रेलिया दौरे याची ग्वाही देतात. २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना स्लेज केलं होतं आणि विराटने आपल्या आक्रमक अंदाजात खेळत चार शतकं झळकावत सडेतोड उत्तर दिलं होतं.
विशेष म्हणजे, कॉन्स्टासने यापूर्वीच कोहली त्याचा आदर्श असल्याचे त्याने सांगितले होते. मैदानावरील या वादानंतर कॉन्स्टास आणि विराट कोहली यांची भेट झाली होती. इतकंच नव्हे तर विराट कोहलीला संपूर्ण कॉन्स्टास कुटुंबीय भेटलं होतं. सॅमच्या भावांनी विराटबरोबर काही फोटो देखील काढले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.