आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत खेळणार
सलामीवीर शर्जील खान आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद सामी यांचा आशिया चषक आणि आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेसाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. बाबर आझम आणि रुमान रईस हे दुखापतग्रस्त झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हा निर्णय घेतला.
‘‘पाकिस्तान सुपर लीग स्पध्रेदरम्यान फलंदाज आझम आणि गोलंदाज रईस यांना दुखापत झाली असून त्यांच्याजागी शर्जील व सामी यांना संधी देण्यात येत आहे,’’ असे पीसीबीने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. पीसीबीच्या माहितीनुसार, इस्लामाबाद युनायटेड संघाच्या सराव सत्रात आझमच्या डाव्या मनगटाला फ्रॅक्चर झाला आणि त्याला तीन ते चार आठवडय़ांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. रईसचे गुडघ्याचे स्नायू ताणले आहेत.
‘‘पाकिस्तान सुपर लीगमधील कामगिरी लक्षात घेता कर्णधार शाहिद अफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांच्यासह निवड समितीने शर्जील व सामीला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला,’’ अशी माहिती निवड समितीचे प्रमुख हारून रशीद यांनी दिली.
पाकिस्तानचा संघ :
शाहिद अफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हाफीझ, शोएब मलिक, उमर अकमल, सर्फराज अहमद, शर्जील खान, इमाद वासिम, अन्वर अली, मोहम्मद इरफान, वहाब रियाझ, मोहम्मद आमीर, मोहम्मद नवाज, खुर्रम मन्झूर, मोहम्मद सामी, इफ्तिखार अहमद (फक्त आशिया चषकासाठी), खलीद लतिफ (फक्त विश्वचषकासाठी).