प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन सर्वाधिक धावसंख्या रचणाचा विक्रम गुजरातच्या सामित गोहेलने रचला आहे. त्याने रणजी चषकामध्ये ओडिशाविरोधात ३५९ धावा काढून ११७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. १८९९ मध्ये ओव्हल येथे सर्रे या संघाच्या बॉबी आबेलने सोमेरसेट विरोधात ३५७ धावा करुन हा विक्रम रचला होता.
गोहेलने ७२३ बॉलमध्ये ४५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५९ धावा केल्या आहेत. तो नाबादच राहिला. गुजरातचा संघ ६४१ बाद झाला आहे. त्यांनी ओडिशाला ७०६ धावांचे लक्ष्य दिले आहे. ३०० धावा काढून नाबाद राहणारा तो गेल्या ८१ वर्षातील पहिला फलंदाज ठरला आहे. गुजरातच्या प्रियांक पांचालने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्रिशतक झळकावले होते.
या सत्रात त्रिशतक करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. गोहेल हा सर्व प्रकारचे शॉट खेळू शकतो परंतु त्याने याआधी त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर केला नाही. या खेळाने त्याचा आत्मविश्वास उंचावेल असे त्याचे प्रशिक्षक विजय पटेल यांनी म्हटले.
गोहेलचा खेळ हा बचावात्मक आहे. कसोटीमध्ये त्याचा भर याच प्रकारच्या खेळावर आहे. पार्थिव पटेलने त्याला याबाबत धडे दिल्यावर त्याच्या खेळात सुधारणा झाली.
पार्थिव पटेलने मार्गदर्शन केल्यानंतर मी माझ्या मानसिकतेमध्ये बदल केला असे गोहेलने म्हटले आहे. माझ्या या यशात त्याचे खूप मोठे योगदान आहे असे त्याने म्हटले. पार्थिव पटेलने सर्व चढ उतारांदरम्यान माझी पाठराखण केली आहे असे त्याने म्हटले. आता मी खेळादरम्यान स्ट्राइक रोटेट करण्यावर भर देतो आणि त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे त्याने म्हटले.