कर्णधार डॅरेन सॅमी आणि दिनेश रामदिन यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या १०६ धावांच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर आघाडी मिळवणे शक्य झाले. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावातील २११ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची ६ बाद १५१ अशी अवस्था होती, पण या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ९६ धावांची आघाडी घेतली. सॅमीने या वेळी ८ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली, तर रामदिनने ८ चौकारांच्या जोरावर ६२ धावा फटकावल्या. झिम्बाब्वेच्या कायले जार्विसने या वेळी ५४ धावांत ५ बळी मिळवले.
दुसऱ्या डावात झिम्बाब्वेची ३ बाद ४१ अशी अवस्था असून ते अजूनही ५५ धावांनी पिछाडीवर आहेत.