आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठे दिग्गज खेळाडू धडाकेबाज आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या आणि पाकिसानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांच्यावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना आगामी लंका प्रीमियर लीगच्या हंगामासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर बनवले आहे. लंका प्रीमियर लीगचा हा तिसरा हंगाम असणार आहे. आधी झालेले दोन हंगाम यशस्वीरित्या पार पडले. अक्रम यांच्याबरोबरच श्रीलंकेचे दिग्गज सनथ जयसूर्या यांनाही लीगचा ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
अक्रम आणि जयसूर्या हे दोघेही लंका प्रीमियर लीगमध्ये सामील झाले आहेत. लंका प्रीमियर लीग ६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर ही स्पर्धा २३ डिसेंबरला संपणार आहे. सर्वकालीन स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या जयसूर्याने श्रीलंकेसाठी २०,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि ४४० बळी घेतले आहेत. तर अक्रमने पाकिस्तानसाठी आपल्या शानदार कारकिर्दीत एकूण ९१६ बळी घेतले आहेत.
लंका प्रीमियर लीगमधून देशाला प्रतिभा उंचावली- जयसूर्या
सनथ जयसूर्याने एका प्रसिद्धीपत्रकात आपली भूमिका मांडली आहे. तो म्हणतो की, “लंका प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मला खूप आनंद होत आहे. देशांतर्गत क्रिकेट कॅलेंडर वर्षात ही स्पर्धा समाविष्ट करणे खूप उत्तम कल्पना आहे. यामुळे श्रीलंकेतील काही उत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू समोर आले आहेत.” जयसूर्या पुढे म्हणाला, “लंका प्रीमियर लीगने आम्हाला सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू शोधण्यासाठी आणि त्यांना तयार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ दिले आहे. जसे आपण या वर्षाच्या सुरुवातीला आशिया चषकमध्ये पाहिले होते. देशाची ही क्रिकेट लीग श्रीलंकेला त्यांचा टी२० आंतरराष्ट्रीय संघ तयार करण्यात मदत करत आहे.
लंका प्रीमियर लीगमध्ये सहभागी होताना आनंद झाला- अक्रम
वसीम अक्रम यांनी निवड झाल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “नेहमीच श्रीलंकेच्या चाहत्यांकडून आदर आणि सन्मान मिळाला आहे. श्रीलंका प्रीमियर लीगमधून (एलपीएल) चांगल्या प्रतीचे खेळाडू तयार केले जात आहेत. आशिया चषकातील विजय हा त्याचे मोठे उदाहरण आहे.” पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने म्हटले, “मी एलपीएलच्या मागील दोन हंगामातील आणि क्रिकेटची स्थिती पाहिली आहे. ती उत्तम दिसली असून पुढील हंगामांमध्येही खेळाडू क्रिकेटचा दर्जा कायम राखतील अशी अपेक्षा आहे.” स्पर्धेच्या पुढील हंगामात एविन लुईस, कार्लोस ब्रॅथवेट, येनेमन मलान, ड्वेन प्रिटोरियस, डी’आर्सी शॉर्ट आणि शोएब मलिक यांसारख्या मोठ्या नावांसह काही स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडू दिसणार आहेत.