Sri Lanka New Interim Head Coach: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये श्रीलंकेचा संघ गट सामन्यांतून बाहेर पडला आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याआधी संघात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या महान फलंदाज महेला जयवर्धने यांनीही आपले पद सोडले होते. आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रशिक्षक नियुक्त करणार आहे आणि यासाठी त्यांनी एका व्यक्तीची निवड केली आहे. भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेपासून ते संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील.
हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
भारतीय संघासाठी कायमचं डोकेदुखी ठरणारा श्रीलंकेचा माजी खेळाडू म्हणजे सनथ जयसूर्या श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ते पदभार स्वीकारणार आहेत. मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बोर्डाने त्याच्याशी संपर्क साधला होता, असे जयसूर्याने म्हटले आहे. याआधीही ते मुख्य निवडकर्ता होते आणि अजूनही सल्लागार म्हणून क्रिकेट मंडळासोबत कार्यरत आहेत.
१९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेले सनथ जयसूर्या यांच्याकडे आता श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी आली आहे. मात्र, त्यांना केवळ काही काळासाठी मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत ते या पदावर राहून संघाला साथ देतील. श्रीलंकेचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान ही मालिका खेळवली जाईल.
हेही वाचा – रोहित-विराटने फायनलमध्ये बॅटिंग करण्यापूर्वीच दिले होते निवृत्तीचे संकेत, भावुक करणारा VIDEO व्हायरल
झिम्बाब्वेनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जातील. २७, २८ आणि ३० जुलै रोजी टी-२० सामने खेळवले जातील. यानंतर २ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होईल. दुसरा एकदिवसीय सामना ४ ऑगस्टला आणि तिसरा एकदिवसीय सामना ७ ऑगस्टला खेळवला जाईल. यामध्येही श्रीलंकेचा संघ सनथ जयसूर्या यांच्या प्रशिक्षणाखाली मैदानात उतरणार आहे.
Sri Lanka Cricket wishes to announce the appointment of Mr. Sanath Jayasuriya as the 'Interim Head Coach' of the National Team. He will function in the position until the completion of Sri Lanka's tour of England in September 2024. https://t.co/ymkI1d9aCx #SLC #lka…
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) July 8, 2024
श्रीलंका संघाच्या क्रिकेट इतिहासातील सनथ जयसूर्या हे खूप मोेठे नाव आहे. त्यांनी ११० कसोटी आणि ४४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ५५ वर्षीय जयसूर्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०११ मध्ये खेळला होता. त्यांनी श्रीलंकेसाठी ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले.