भारतीय संघात पुनरागमनासाठी संघर्ष करणारा ड्रॅगफ्लीकर संदीपसिंग हा हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पुन्हा संघात स्थान मिळविण्याबाबत आशावादी आहे. संदीपसिंग याने गतवर्षी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली होती, मात्र ऑलिम्पिक स्पर्धेत त्याची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही, त्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतही त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी तो उत्सुक झाला आहे.
भारतीय संघाबाहेर बराच काळ असल्यामुळे मी अतिशय बेचैन झालो आहे. हॉकी इंडिया लीग स्पर्धा माझ्यासाठी भारतीय संघाची दारे पुन्हा ठोठावण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तेथे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. मी त्यासाठी खूप परिश्रम घेतले आहे. पेनल्टी कॉर्नरवर सतत यश मिळवत निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा माझा प्रयत्न राहील असे संदीपसिंग याने सांगितले. तो मुंबई मॅजिशियन्स संघाकडून हॉकी लीगमध्ये खेळणार आहे.  
संदीपसिंगप्रमाणेच अन्य अनुभवी व नवोदित खेळाडूंसाठीही लीग स्पर्धा भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुवर्णसंधी मानली जात आहे. या संदर्भात संदीप म्हणाला, ही स्पर्धा भारतीय हॉकी क्षेत्रास पुनर्जीवन देणारी स्पर्धा असेल. या स्पर्धेत नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची हुकमी संधी मिळणार आहे.
हे खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत खेळणार असल्यामुळे त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची व त्यांच्याकडून काही मौलिक शिकण्याची संधी आपल्या तरुण खेळाडूंना मिळणार आहे. विशेषत: जेमी डॉयर, टय़ुन डीनुजीर व मॉरिट्झ फुस्र्टे या खेळाडूंकडून बरेच काही शिकावयास मिळणार आहे. तसेच रिक चार्ल्सवर्थ, बॅरी डान्सर यांच्यासारखे श्रेष्ठ प्रशिक्षक या स्पर्धेतील विविध फ्रँचाईजीचे प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. त्याचाही फायदा भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.
आपल्या देशात उदयोन्मुख खेळाडूंपुढे आर्थिक समस्यांचा अडथळा असतो. हॉकी लीगद्वारे नवोदित खेळाडूंनाही चांगला पैसा मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या कारकीर्दीकरिता हा पैसा स्फूर्तिदायक ठरेल असेही संदीपसिंगने सांगितले.