बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांना त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाचा ठरावात २-५५ अशा मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. संघटनेचे सरचिटणीस जय
कवळी यांनी पराभव होणार हे अधोरेखित सत्य ओळखून या ठरावापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
रविवारी नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या विशेष सर्वसाधारण सभेला ६४ सदस्य उपस्थित होते. आपण हा ठरावजिंकू, असे कालपर्यंत छातीठोकपणे सांगणारे जजोडिया यांनी या सभेला पाठ फिरवली. कवळी यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा त्याग करीत अविश्वास ठरावात होणाऱ्या पराभवाची नामुष्की टाळली.
या सभेबाबत माहिती देताना पश्चिम बंगालचे प्रतिनिधी असित बॅनर्जी यांनी सांगितले, ‘‘आम्ही जजोडिया यांना राजीनामा देण्यासाठी पुरेसा अवधी दिला होता, मात्र त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. ५५-२ अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. महासंघाचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी लवकरच आम्ही प्रभारी अध्यक्षाची निवड करणार आहोत. ४५ ते ६० दिवसांमध्ये महासंघाची निवडणूक घेतली जाईल.
एक दिवसांत याबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला (एआयबीए) कळवणार आहोत. निवडणुकांबाबत त्यांच्या नियमांचे पालन केले जाईल.’’
या सभेच्या ठिकाणी भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाचे माजी अध्यक्ष अभयसिंह चौताला हे उपस्थित होते. मात्र त्यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला नसल्याचे समजते. बॉक्सिंग इंडियाचे सध्याचे उपाध्यक्ष मिरेन पॉल यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

माझ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी झालेली सभाच बेकायदेशीर होती. ज्या संघटनांच्या प्रतिनिधींनी ही सभा आयोजित केली होती. त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची होती. त्यामुळे बेकायदेशीर ठरावाचे होणारे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.
– संदीप जजोडिया

जजोडिया यांनी केलेला दावा चुकीचा आहे. कारण त्यांना याच प्रतिनिधींनी अध्यक्षपदावर निवडून आणले होते. या सभासदांनी ज्या काही त्रुटी दाखविल्या आहेत, त्या खरोखरीच गंभीर आहेत. त्यांच्या तक्रारींची अनेक दिवस दखल घेतली जात नसेल, तर ते प्रतिनिधी अविश्वास ठराव मांडणारच.
– अभयसिंह चौताला

Story img Loader