उद्योगपती संदीप जाजोदिया यांची बॉक्सिंग इंडियाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मान्यता दिलेल्या या संघटनेची निवडणूक मुंबईत ९ जुलै रोजी होणार आहे. त्या वेळी जाजोदिया यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल.
भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएआय) एआयबीएच्या नियमावलींचे उल्लंघन केल्याबद्दल एआयबीएने डिसेंबर २०१२ मध्ये भारताचे सभासदत्व स्थगित केले होते व त्यानंतर बॉक्सिंग इंडियाला तात्पुरती मान्यता दिली होती व नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. जाजोदिया यांना २६ राज्य सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. बॉक्सिंग इंडियाची नुकतीच येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये २६ राज्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जागतिक बॉक्सिंग सीरिजच्या फ्रँचाईजीचे मालक उदित सेठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते.