राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील पुन्हा मुंबई क्रिकेटच्या वाटेवर येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) संदीप पाटील यांच्यापुढे ठेवला आहे. या प्रस्तावाबाबत पाटील सकारात्मकरीत्या विचार करीत असल्याचे वृत्त आहे.
पाटील यांच्याकडे गेल्या मोसमात मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. पण स्थानिक क्रिकेटला ते वेळ देऊ शकत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी नैतिकतेच्या आधारावर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण एमसीएने पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी पाटील यांचे दार ठोठावले असून, तेसुद्धा या पदासाठी उत्सुक असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईच्या संघाची दमदार बांधणी करण्याचा पाटील यांचा मानस आहे. त्यामुळे आगामी मोसमासाठी पाटील निवड समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.
निवड समितीसाठीही निकष
निवड समितीच्या सदस्यपदासाठी काही निकष असायला हवेत, असा निर्णय एमसीए काही दिवसांमध्ये घेण्याची शक्यता आहे. रणजी निवड समिती अध्यक्षपदासाठीचा उमेदवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असायला हवा, असा निकष एमसीए लावणार आहे, तर निवड समिती सदस्य किमान २५ प्रथम श्रेणी सामने खेळलेला असावा. त्याचबरोबर विविध गटांसाठीचा निवड समिती सदस्य किमान विद्यापीठ दर्जाचे क्रिकेट खेळलेला असावा, असे निकष असतील. निवड समिती सदस्यांची नावे तांत्रिक समिती सुचवणार असून, त्यावर कार्यकारिणी समिती अखेरचा निर्णय घेणार आहे.