मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील प्रथमच मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी ‘एमसीए’ची निवडणूक होणार असून आपण अध्यक्षपद भूषवण्यासाठी इच्छुक असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘‘मुंबई क्रिकेटने मला खूप काही मिळवून दिले आहे. ‘एमसीए’चे माझ्या आयुष्यात खूप मोठे योगदान आहे. आता या योगदानाची मला परतफेड करायची आहे,’’ असे पाटील म्हणाले.
‘‘गेल्या निवडणुकीतही मी अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो. मात्र, मी एका क्रीडा वाहिनीवर समालोचन करत असल्याने हितसंबंधांच्या नियमामुळे मी अर्ज भरला नाही. यंदा मात्र मी निवडणूक लढवणार आहे,’’ असेही पाटील यांनी सांगितले. ‘एमसीए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची पाटील यांची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी १९९६च्या ‘एमसीए’ निवडणुकीत पाटील यांची कार्यकारिणी समिती सदस्यपदी निवड झाली होती.
माधव मंत्री यांच्यानंतर कोणत्याही माजी खेळाडूने ‘एमसीए’चे अध्यक्षपद सांभाळलेले नाही. अजित वाडेकर आणि दिलीप वेंगसरकर या माजी कसोटी कर्णधारांना ‘एमसीए’ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ६६ वर्षीय पाटील यांनी २९ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्यांचा समावेश होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारत, भारत ‘अ’ आणि केनिया या संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले. तसेच त्यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.