मुंबईच्या नव्या प्रशिक्षकाचा निर्णय आता काही दिवस लांबणीवर पडला आहे. मुंबईच्या निवड समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी सल्लामसलत करून कार्यकारिणी समिती २५ एप्रिलला सायंकाळी नव्या प्रशिक्षकांची घोषणा करणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
रणजी करंडकाच्या इतिहासात ४० वेळा जिंकण्याचा पराक्रम गाठीशी असणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना आपले पद गमवावे लागले होते. त्यानंतर उर्वरित हंगामासाठी लालचंद रजपूत यांनी तात्पुरत्या स्वरूपात मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. याचप्रमाणे मुंबईच्या अन्य वयोगटांच्या संघांचीही कामगिरी या वर्षी समाधानकारक झाली नव्हती.
या पाश्र्वभूमीवर स्थानिक क्रिकेटचा हंगाम संपत असतानाच एमसीएने नव्या हंगामाच्या दृष्टीने मोट बांधली आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची निवड समिती सज्ज केल्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ गटासाठीच्या प्रशिक्षकपदाची नियुक्ती सोमवारी होणार होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता २५ तारखेपर्यंत इच्छुकांशी मुलाखती आणि पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षक पदाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली.
एमसीएचे कोषाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी सांगितले की, ‘‘अनेक जणांच्या मुलाखतींमुळे सोमवारचा दिवस कार्यकारिणी समितीसाठी दगदगीचा होता. आगरकर आणि माने परदेशांमध्ये असल्यामुळे हजर राहू शकले नाहीत. दोन दिवसांनंतर ते मुंबईत येतील. मग त्यांच्याही मुलाखती घेण्यात येतील. त्यानंतरच २५ एप्रिलला मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा निर्णय घेण्यात येईल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा