वेगवान गोलंदाज संदीप शर्माने केवळ चार चेंडूंमध्ये तीन बळी घेतल्यामुळेच पंजाबला विदर्भ संघाविरुद्ध रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळविता आली. दिवसअखेर त्यांनी दुसऱ्या डावात ६ बाद २११ धावा करीत आपली बाजू बळकट केली.
पंजाबने पहिल्या डावात केलेल्या १९५ धावांना उत्तर देताना विदर्भ संघाने ६ बाद १४९ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र, आणखी नऊ धावांमध्ये त्यांनी उर्वरित चार बळी गमावले. पंजाबच्या शर्माने त्यापैकी तीन बळी मिळवीत या डावात ५१ धावांत पाच विकेट्स मिळविण्याचा पराक्रम केला. विदर्भ संघाचा डाव १५८ धावांमध्ये आटोपला.
पंजाबच्या जीवनजोतसिंग (६५) व गितांश खेरा (नाबाद ५९) यांनी शैलीदार फलंदाजी करीत संघाला दुसऱ्या डावात आश्वासक धावसंख्या उभारण्यात साथ दिली. दिवसअखेर त्यांनी २४८ धावांची आघाडी मिळविली आहे. मनदीपसिंग (२५), गुरकिरत मान (२२) व तरुवर कोहली (२९) यांनीही पंजाबच्या धावसंख्यला हातभार लावला.