प्रत्येक गुणासाठी जबरदस्त संघर्ष झालेल्या अंतिम सामन्यात सांगली संघाने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत भाई नेरुरकर स्मृतिचषक आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत पुरुष गटाच्या जेतेपदावर कब्जा केला. त्यांनी अवघ्या एका गुणाने कोल्हापूरवर मात केली. महिलांमध्ये साताऱ्याने जेतेपदावर नाव कोरले. किशोर गटात सांगलीने, तर किशोरी गटात पुण्याने जेतेपदाला गवसणी घातली.
शेरास सव्वाशेर कामगिरी, संरक्षण करताना काटक क्षमतेचे प्रदर्शन घडवणारी पळण्याची क्षमता, चित्त्याच्या वेगाने केलेले आक्रमण यामुळे कोल्हापूर आणि सांगली यांच्यातला अंतिम फेरीचा चुरशीचा सामना निर्धारित डावामध्ये १८-१८ असा बरोबरीत सुटला. निर्णायक डावातही अत्यंत चुरशीच्या मुकाबल्यात सांगलीने अवघ्या एका गुणाने कोल्हापुरावर २७-२६ अशी मात करत जेतेपदावर नाव कोरले.
१.२०, १.१० मिनिटे संरक्षणासह तब्बल १२ गडी बाद करणारा युवराज जाधव सांगलीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शीतल पाटीलने १.४०, १.०० तसेच १.१० मिनिटे संरक्षण करताना एक गडी टिपला. मैयप्पा हिरेकुर्बने १.२०, १.०० मिनिट संरक्षण करताना ३ गडी टिपले.
महिलांमध्ये साताऱ्याला जेतेपद
स्पर्धेत मुंबईचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या मुंबई उपनगरला साताऱ्याकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. साताऱ्याने एक गुण आणि ४.३० मिनिटे राखून उपनगरवर मात केली. मध्यंतराला साताऱ्याकडे एका गुणाची आघाडी होती. मध्यंतरानंतर प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. मात्र आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाडय़ांवर शानदार कामगिरी करत साताऱ्याने महिला गटाच्या जेतेपदावर नाव कोरले. साताऱ्यातर्फे प्रियांका येळेने २.३० तसेच ४.३० मिनिटे संरक्षण करताना १ गडी बाद केला. करिश्मा नगारजीने २.०० तसेच १.५० मिनिटे संरक्षण केले.
 किशोर गटात सांगलीची बाजी
युवा शक्तीचे अफलातून प्रदर्शन झालेल्या सामन्यात सांगलीने ठाण्याला चीतपट करत जेतेपदाला गवसणी घातली. सांगलीने ठाण्यावर १९-१५ असा पाच गुणांनी विजय मिळवला. सांगलीतर्फे हृषीकेश साळुंखेने २.३० तसेच १.३० मिनिटे संरक्षण करताना ४ गडी बाद केले. विवेक नागावकरने १.४० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. उदय भोसलेने ५ गडी टिपत विजयात निर्णायक भूमिका बजावली.
किशोरी गटात पुणे अव्वल
पुणे संघाने अहमदनगरचा एक डाव आणि ५ गुणाने धुव्वा उडवत किशोरी गटाचे जेतेपद पटकावले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या पुण्याने अहमदनगरला डोके वर काढण्याची कोणतीही संधी न देता दणदणीत विजय मिळवला. पुण्यातर्फे प्रियांका इंगळेने २.१० मिनिटे संरक्षण करताना ४ गडी बाद केले. प्रणाली बेनकेने ३.२० मिनिटे संरक्षण करताना १ गडी बाद केला. सपना जाधवने २.१० नाबाद संरक्षण करताना एक गडी बाद केला.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
पुरुष गट
सवरेत्कृष्ट संरक्षक- बाळासाहेब योकार्डे (कोल्हापूर)
सवरेत्कृष्ट आक्रमक- मिलिंद चावरेकर (सांगली)
सवरेत्कृष्ट अष्टपैलू- युवराज जाधव (सांगली)
महिला गट
सवरेत्कृष्ट संरक्षक- मोक्षदा हातणकर (मुंबई उपनगर)
सवरेत्कृष्ट आक्रमक- प्राजक्ता कुचेकर (सातारा)
सवरेत्कृष्ट अष्टपैलू- प्रियांका येळे (सातारा)
किशोर गट
सवरेत्कृष्ट संरक्षक- विवेक नागावकर (सांगली)
सवरेत्कृष्ट आक्रमक- संकेत कदम (ठाणे)
सवरेत्कृष्ट अष्टपैलू- हृषीकेश साळुंखे (सांगली)
किशोरी गट
सवरेत्कृष्ट संरक्षक- काजल भोर (पुणे)
सवरेत्कृष्ट आक्रमक- गौरी भगत (अहमदनगर)
सवरेत्कृष्ट अष्टपैलू- प्रणाली बेनके (पुणे)

Story img Loader