ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात सांगलीने तर महिला गटात यजमान ठाणे संघाने जेतेपदाला गवसणी घातली. मुंबई उपनगरच्या संघांना दोन्ही गटात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या सांगलीने मुंबईचे कडवे आव्हान १५-१३ असे परतवून लावत अजिंक्यपद पटकावले. मध्यंतराला सांगलीने एका गुणाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात आक्रमणाच्या वेळी भरपूर वेळा नियमांचे उल्लंघन (फाऊल्स) झाल्यामुळे सांगलीला मुंबईचे सहा बळी टिपता आले. विजयासाठी मुंबईला आठ बळी टिपण्याची आवश्यकता होती. पण मोक्याच्या क्षणी सांगलीच्या खेळाडूंनी खेळ उंचावल्यामुळे मुंबईला केवळ पाच बळी मिळवता आले. नरेश सावंत (२.१० मि. व १ बळी), दीपक माने (१.४० मि., २ मि. व १ बळी), रमेश सावंत (१ मि., २.१० मि. व १ बळी), युवराज जाधव (२.१० मि. व ४ बळी) आणि मिलिंद चावरेकर (१.३० मि., १.४० मि. व ५ बळी) हे सांगलीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबईकडून प्रयाग कनगुटकर (१.१० मि. व २ मि.), प्रसाद राडय़े (३ बळी), राहुल उईके (१.५० मि. व ३ बळी) यांनी चांगली लढत दिली.
महिला गटात यजमान ठाणे संघाने उस्मानाबादवर ९-७ असा १ डाव आणि २ गुणांनी विजय मिळवत अजिंक्यपद मिळवले. मध्यंतराला ठाणे संघाने ५ गुणांची भक्कम आघाडी मिळवली होती. संरक्षण आणि आक्रमणात सर्वोत्तम कामगिरी करत ठाणे संघाने सहज विजय साकारला. विजयी संघाकडून पोर्णिमा सकपाळ (३ मि., १.३० मि. व १ बळी), प्रियांका भोपी (१.५० मि. व ४ बळी), मीनल भोईर (२ बळी) आणि कविता घाणेकर (२ बळी) यांनी सुरेख खेळ केला. स्पर्धेतील सर्वोत्तम संरक्षक म्हणून नरेश सावंत (सांगली) आणि पोर्णिमा सकपाळ (ठाणे) यांची निवड झाली.
आक्रमक खेळाडूचे पारितोषिक राहुल उईके (मुंबई) आणि मीनल भोईर (ठाणे) यांनी पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिलिंद चावरेकर (सांगली) आणि सारिका काळे (उस्मानाबाद) यांनी मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा