महाराष्ट्राचा संग्राम चौगुले दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता
सर्वोत्तम प्रदर्शन घरच्या मैदानावर होते असे म्हणतात, परंतु पुण्याच्या संग्राम चौगुलने लुधियाना आपले दुसरे घर असल्यागत सिद्ध करत नवव्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपदावर नाव कोरले. गेल्या वर्षी लुधियानामध्येच झालेल्या फेडरेशन चषकातही संग्रामने अव्वल स्थान पटकावले होते.
संग्राम ज्या वजनी गटातून खेळला त्या गटाची परफॉर्मन्सची वेळ शेवटी होती.. मात्र तरीही चाहत्यांनी उत्साह कायम राखला.. त्याच्या नावाचा पुकारा होताच टाळ्या, शिटय़ा आणि जल्लोषाला उधाण आले.. संग्रामनेही जबरदस्त आत्मविश्वासाने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या माध्यमातून विविध पोझ सादर केल्या. त्याच वेळी संग्राम केवळ या गटाचा नाही, तर सर्वसाधारण जेतेपदावरही कब्जा करणार, अशी चर्चा प्रेक्षकांत रंगली होती. चाहत्यांच्या या विश्वासाला पात्र ठरत संग्रामने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला.
लुधियानाच्या गुरुनानक मल्टिपरपज केंद्रात रंगलेल्या या स्पर्धेत भारताच्या शरीरसौष्ठवपटूंनी आशिया खंडातले आपले वर्चस्व दाखवून दिले. नऊपैकी सात गटांमध्ये भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्णपदक कमावले. भारताच्या तुलनेत देशांतर्गत परिस्थिती प्रतिकूल असूनही अफगाणिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. त्यांच्या हमीदुल्ला शरजाईने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकासह सवरेत्कृष्ट पोझरचा मानही पटकावला.
महाराष्ट्र सरकार आता तरी दखल घेईल- संग्राम चौगुले
रविवारी स्पर्धेत असलेल्या बॉबी सिंग आणि मुकेश सिंग यांनी गेल्या दोन वर्षांत मिस्टर इंडिया स्पर्धेत नमवले होते. या दोघांचे तगडे आव्हान मोडून काढत जेतेपद पटकावण्याचा माझा निश्चय होता. तो पूर्ण झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. चार मिस्टर इंडिया किताब आणि अन्य आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावूनसुद्धा मला सरकारी नोकरी मिळालेली नाही. या जेतेपदानंतर तरी महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे. सरकारी नोकरी मिळाल्यास शरीरसौष्ठवावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.    
सविस्तर निकाल
सर्वसाधारण विजेतेपद : संग्राम चौगुले (आशिया)
सवरेत्कृष्ट पोझर : एच. शरजाई (अफगाणिस्तान)
सांघिक जेतेपद : भारत
सांघिक उपविजेतेपद : अफगाणिस्तान
५५ किलो वजनी गट : सी. कलईवानन (भारत)
६० किलो : सचित प्रधान (नेपाळ)
६५ किलो : प्रदीपकुमार सिंग (भारत)
७० किलो : राजू खान (भारत)
७५ किलो : हमीदुल्ला शरजाई (अफगाणिस्तान)
८० किलो : के. बॉबी सिंग (भारत)
८५ किलो : तन्वीर अक्रम (भारत)
९० किलो : संग्राम चौगुले (भारत)
९५ किलो : मुकेश सिंग (भारत).

Story img Loader