चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाच्या निवडीवरून वाद रंगला होता. वैयक्तिक हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोपांनी भारतीय टेनिसची नाचक्की झाली होती. रिओ ऑलिम्पिक आता अवघ्या काही महिन्यांवर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोण कोणासोबत खेळणार याविषयी तर्कवितर्काना उधाण आले आहे. मात्र इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या निमित्ताने बोलताना सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी एकत्र खेळण्याचे संकेत दिले आहेत.
ऑलिम्पिक संदर्भात सध्या बोलणी सुरू आहेत. त्याविषयीची अधिकृत घोषणा काही दिवसांत करण्यात येईल, असे सानियाने स्पष्ट केले. रोहनसह खेळतानाच्या शानदार कामगिरीच्या रहस्याबाबत विचारले असता सानिया म्हणाली, ‘‘१४व्या वर्षी रोहन माझा मिश्र दुहेरीतील पहिला साथीदार होता. त्यानंतर अनेक वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत. हॉपमन चषकातही आम्ही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आठ-नऊ वर्षे एकत्र खेळताना आम्ही अपराजित होतो. एकमेकांचा खेळ, डावपेच आम्ही सहजतेने समजून घेतो. खेळाव्यतिरिक्त आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. माझ्या जवळच्या मित्रांपैकी रोहन एक आहे. आमची मैत्री घट्ट असल्याने खेळतानाही दडपणाच्या वेळी उपयोग होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसच्या साथीने खेळताना मी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. साहजिकच पुढेही त्याच्यासह खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र रोहनसह पुन्हा खेळायला सुरुवात करू शकते.’’
सानियाच्या मताशी सहमत होताना बोपण्णा म्हणाला, ‘‘माणूस म्हणून आम्हाला एकमेकांची सखोल माहिती आहे. एखादा फटका खेळताना, प्रत्युत्तर देताना काय विचार केला जाईल, याची कल्पना असते. त्यामुळेच कोर्टबाहेरची मैत्री कोर्टवरही उपयोगी ठरते.’’
ऑलिम्पिकसाठी लिएण्डर पेससह खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याच्या साथीने खेळणार का? या प्रश्नावर बोपण्णाने थेट नकार दिला. ‘‘लंडन ऑलिम्पिकच्या वेळी महेशसह मी सहा महिने खेळण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी माझ्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे यंदा तसे काहीच करणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्लोरिन मर्गेआच्या साथीने माझी कामगिरी बहरली आहे. वर्षअखेरीस होणाऱ्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मानही मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये आमचा समावेश झाला
आहे. यशस्वी जोडी फोडण्याचे काहीच कारण नाही,’’ असे सांगत बोपण्णाने पेससह जोडी होण्याची शक्यता फेटाळून लावली.
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भरगच्च वेळापत्रक असते आणि टेनिसपटूंची वाटचाल ‘एकला चलो रे’ सुरू असते. आयपीटीएलच्या निमित्ताने असंख्य खेळाडूंशी ओळखी झाल्या, मैत्री
झाली. विविध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी संवाद वाढला. मोठे खेळाडू माणूस म्हणून कसे आहेत हे समजून घेता आले,’’ असे सानियाने सांगितले.

दिग्गज टेनिसपटूंची दिल्लीला बगल
आयपीटीएलचा दिल्ली टप्पा म्हणजे टेनिसरसिकांसाठी अव्वल खेळाडूंना पाहण्याची दुर्मीळ संधी असेल, असा दावा संयोजकांनी वारंवार केला होता. संपूर्ण दिल्लीभर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या जाहिराती झळकत आहेत. प्रत्यक्षात मात्र रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांचा अपवाद वगळता बहुतांशी मोठय़ा खेळाडूंनी दिल्ली टप्प्यातून माघार घेतली आहे. त्यातही फेडरर तीनपैकी केवळ एका दिवसासाठी दिल्लीत अवतरणार आहे. दुसरीकडे इंडियन एसेसचा भाग असलेला नदाल शुक्रवारी संघाचा सामना सुरू असताना स्टेडियम परिसरातही नव्हता. यंदाच्या वर्षांत जेतेपदे पटकावण्यात अद्भुत सातत्य जपणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने यंदा लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जोकोव्हिचला दिल्लीकरांचा जोरदार पाठिंबा मिळाला होता. नदाल-फेडरर-जोकोव्हिच त्रिकुटाची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरची सद्दी मोडणाऱ्या अँडी मरे आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांनीही दिल्ली टप्प्यात न खेळणेच पसंत केले. विशेष म्हणजे काही दिवसांतच चेन्नईत होणाऱ्या चेन्नई खुल्या स्पर्धेत वॉवरिन्काला अग्रमानांकित देण्यात आले आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी वॉवरिन्का खेळणार आहे, मात्र आयपीटीएलचा दिल्ली टप्पा वॉवरिन्काला फारसा भावलेला नाही. इंडियन एसेसचे प्रतिनिधित्व करणारा गेइल मॉनफिल्स दुखापतग्रस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडाचा झेंडा अभिमानाने फडकवणारा जपानचा केई निशिकोरी तसेच कॅनडाचा मिलोस राओनिक दिल्ली टप्प्यात फिरकलेले नाहीत. मनिला आणि कोबे येथे झालेल्या सामन्यांमध्ये सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय महिला टेनिसमधील या दमदार खेळाडूंनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीला बगल दिली आहे.

आयपीटीएलची सीटीएलवर कुरघोडी
‘‘आमची लीग आंतरराष्ट्रीय आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल वीसमधील खेळाडूंचा सहभाग, हे आमच्या लीगचे वैशिष्टय़ आहे. अन्य कोणत्याही लीगपासून आम्हाला धोका नाही,’’ असे आयपीटीएलचा संस्थापक महेश भूपती वारंवार सांगतो. दुसरीकडे भारतीय टेनिसपटूंना संधी आणि त्यांचा विकास हे आमचे उद्दिष्ट असल्याचे चॅम्पियन्स टेनिस लीगचे प्रवर्तक विजय अमृतराज यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात आकडे आणि मांडणी पातळीवर भव्य असूनही भूपतीप्रणीत आयपीटीएलने जाणीवपूर्वक सीटीएलमधील खेळाडूंना आपल्याकडे खेचून आणले आहे. गेल्या वर्षी सीटीएलचे प्रमुख आकर्षण असलेल्या भारताच्या चिरतरुण लिएण्डर पेसला भूपतीने कटू इतिहास बाजूला सारून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. पेसच्या बरोबरीने अ‍ॅग्निझेस्का रडवानस्का, सोमदेव देववर्मन, मार्क फिलीपायुस, थॉमस एन्क्विस्ट अशा चार खेळाडूंना आपल्याकडे वळवत भूपतीने स्वत:मधील चतुर व्यावसायिकपणा सिद्ध केला आहे.

Story img Loader