भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची सहकारी मार्टिना हिंगिस यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयाची मालिका कायम राखत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर भारताच्या रोहन बोपण्णाने पुरुष दुहेरीमध्ये विजयी सलामी दिली आहे.
गेल्या आठवडय़ात सानिया-हिंगिस जोडीने सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती, हे त्यांचे सलग अकरावे जेतेपद होते. सानिया-हिंगिस जोडीने सलग ३१ वा सामना जिंकत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. या जोडीने मारिया डुक्यू आणि तेलिएना परेरा यांना महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत ६-२, ६-३ असे ७० मिनिटांमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सानिया-हिंगिस यांना युक्रेनच्या नादिया किचेनॉक आणि ल्यूदमिला किचेनॉक या जुळ्या बहिणींचा सामना करावा लागणार आहे.
बोपण्णाने आपला रोमानियाचा सहकारी फ्लोरिन मेर्गीच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या ओमर जासिका आणि निक किरगिऑस यांच्यावर ७-५, ६-३ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत बोपण्णा-मेर्गी जोडीला लुककास डलोही आणि जिरी व्हेस्ले यांचा सामना करावा लागणार आहे.
भारताच्या महेश भूपतीने पुरुष दुहेरीमध्ये गिल्स म्युलरबरोबर खेळताना यापूर्वीच दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. लिएण्डर पेस-जर्मी चार्डी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा