भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि युवा टेनिसपटू अंकिता रैना आगामी बिली जीन किंग कप वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहेत. पुढच्या महिन्यात लातवियाविरुद्ध होणाऱ्या या स्पर्धेसाठी अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) पाच सदस्यीस भारतीय संघाची घोषणा केली आहे. मागील वर्षी संघाची सदस्य असलेली रिया भाटिया राखीव खेळाडू असेल.
विशाल उप्पलकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. दोन दिवसीय सामना 16 एप्रिलपासून जर्मलाच्या लीलूप येथे नॅशनल टेनिस सेंटरमधील इनडोअर हार्ड कोर्टवर खेळला जाईल. मार्च २०२०मध्ये दुबई येथे झालेल्या आशिया / ओसियाना ग्रुप ए सामन्यात दुसरे स्थान मिळवल्यानंतर भारताने प्रथमच वर्ल्ड ग्रुप प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. लातवियाला त्यांच्या गटात अमेरिकेकडून 2-3 अशी मात खावी लागली होती.
भारताचा मार्ग खडतर
हा सामना भारतासाठी खडतर असेल. कारण माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत 53व्या स्थानी असलेली येलेना ओस्टापेन्को लातवियाचे नेतृत्व करेल. यूएस ओपन 2018च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेली अनास्तासिजा सेवास्तोवा तिची जोडीदार असेल. सेवास्तोवा फेब्रुवारी 2018मध्ये जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी होती. वर्ल्ड ग्रुप प्लेऑफ स्पर्धा पूर्वी फेड कप म्हणून ओळखली जात होती. कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही स्पर्धा दोन वेळा स्थगित करण्यात आली आहे.
भारतीय संघ
सानिया मिर्झा, अंकिता रैना, करमन कौर थंडी, जिल देसाई आणि रुतुजा भोसले.
राखीव: रिया भाटिया.