भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांनी झेक प्रजासत्ताकची इव्हा हार्डिनोव्हा आणि रशियाची व्हॅलेरिया सोलोव्हेया यांच्यावर सहज मात करत डब्ल्यूटीए पोर्तुगाल खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. सानिया-कारा जोडीचे या मोसमातील हे पहिले जेतेपद ठरले.
या मोसमात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत खेळताना सानिया-कारा जोडीने हार्डिनोव्हा-सोलोव्हेया यांच्यावर एक तास १८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ६-४, ६-३ असा विजय मिळवला. यापूर्वी इंडियन वेल्स आणि स्टुटगार्ट खुल्या स्पर्धेत सानिया-कारा जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पहिल्या सेटमध्ये सानिया-कारा जोडीने ३-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र हार्डिनोव्हा-सोलोव्हेया जोडीने कडवी लढत देत ४-४ अशी बरोबरी साधली. मात्र १०व्या गेममध्ये सानिया-कारा यांनी प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदल्यामुळे त्यांना पहिला सेट जिंकता आला. दुसरा सेटही अटीतटीचा झाला. ३-३ अशा बरोबरीनंतर काराने ब्रेकपॉइंट वाचवत ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. आठव्या गेममध्ये हार्डिनोव्हा-सोलोव्हेया जोडीची सव्‍‌र्हिस भेदून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader