भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक यांनी यंदाच्या मोसमाचा गोड शेवट केला आहे. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवत सानिया आणि कारा यांनी महिला दुहेरीमध्ये जेतेपदाला गवसणी घातली.
अंतिम फेरीत सानिया-कारा जोडीने चायनीज तैपेईच्या सु-वेई-हेइह आणि चीनच्या शुएई पेंग यांचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सानिया आणि कारा आक्रमक होते आणि सामना संपेपर्यंत त्यांनी हा आक्रमकपणा कायम ठेवला. पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पध्र्यानी या दोघांनी फक्त एकच गेम जिंकायला दिला. पहिल्या सेटमध्ये दमदार आघाडी घेतल्यावर सानिया आणि कारा यांचे मनोबल कमालीचे उंचावले आणि याचाच प्रत्यय दुसऱ्या सेटमध्ये दिसला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी एकही गेम प्रतिस्पध्र्याना जिंकू दिला नाही आणि सहजपणे जेतेपद पटकावले.
‘‘हे टेनिस आहे, यामध्ये तुम्हाला संधी मिळत असते, पण त्यासाठी तुम्हाला जिद्दीने मैदानात उतरून लढावे लागते. आम्ही हे जेतेपद पटकावल्याचा आनंद आहे, हे सारे अद्भुत असेच आहे. हे वर्ष आमच्यासाठी खास ठरले. वर्षांच्या शेवटी मिळवलेले जेतेपद संस्मरणीय आहे.’’
– सानिया मिर्झा, भारताची अव्वल महिला टेनिसपटू

Story img Loader