Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याच्या बातम्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून समोर येत आहेत. मात्र पहिल्यांदाच सानिया मिर्झाने एक पोस्ट लिहित तिच्या आयुष्यावर भाष्य केलं आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएब यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा घटस्फोट होईल अशा बातम्या येत आहेत. मात्र या दोघांपैकी कुणीही सोशल मीडियावर किंवा माध्यमांशी बोलताना याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता सानिया मिर्झाने एक पोस्ट केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे. ही पोस्ट लग्न आणि घटस्फोट अशा दोहोंविषयी आहे.

काय आहे सानिया मिर्झाची पोस्ट?

सानिया पोस्टमध्ये म्हणते.. ‘लग्न असो किंवा घटस्फोट दोन्ही कठीणच, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. जाड राहणं कठीण आहे आणि फिट राहणंही कठीण, तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. कर्जात बुडणं कठीण आहे, आर्थिक शिस्त लावणंही कठीण आहे. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. बोलणं कठीण आहे आणि मौन बाळगणंही कठीण. तुम्हाला काय कठीण वाटतंय ते निवडा. आयुष्य कधीही सोपं नसतं ते कठीणच असतं. आपण ते आपल्या मेहनीतने निवडतो. त्यामुळे विचार करा आणि मग निवड करा.’ या आशयाची एक पोस्ट सानिया मिर्झाने लिहिली आहे. ती घटस्फोट घेणार आहे की नाही हे तिने स्पष्ट केलेलं नाही. मात्र जे समजू शकतात त्यांना या ओळींचा अर्थ नक्कीच समजला असेल.

Saina Mirza Post
सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

२०१० मध्ये या दोघांचं लग्न झालं

२०१० मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचं लग्न झालं. या दोघांचा प्रेमविवाह आहे. २००३ मध्ये हे दोघं पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीत दोघांमध्ये फार चर्चा झाली नाही. त्यानंतर दुसरी भेट होण्यासाठी बराच वेळ गेला. मात्र त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि २०१० मध्ये या दोघांनी लग्न केलं. २०१८ मध्ये शोएब आणि सानियाला मुलगा झाला. ज्याचं नाव इजहान मिर्झा मलिक आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शोएब काय म्हणाला होता?

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना शोएब मलिकला त्याच्या व सानियाच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत विचारण्यात आले. यावर शोएब मलिक म्हणाला होता, “मला यावर काहीही बोलायचं नाही. मी सांगू इच्छितो की ईदच्या दिवशी आम्ही एकत्र असतो तर खूप छान झालं असतं. पण सानियाला आयपीएलमध्ये काम करायचं आहे. ती आयपीएलमध्ये शो करतेय, म्हणूनच या ईदला आम्ही एकत्र नाही. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतो. मला तिची खूप आठवण येते, एवढंच मी म्हणू शकतो. प्रत्येकाला आपलं काम करावं लागतं, पण ईद असा दिवस असतो जेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांची आठवण येते.” मात्र त्यानंतर शोएबचं कुठलंही वक्तव्य समोर आलं नाही. अशात सानियाने जी पोस्ट शेअऱ केली त्याची चर्चा होते आहे.

Story img Loader