पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी काडीमोड घेतल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असून आमच्यामध्ये घटस्फोट घेण्यासारखे काहीही घडलेले नाही, असे भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सांगितले.
सानिया हिने शोएबपासून घटस्फोट घेतला असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले होते. या वृत्ताचा स्पष्ट इन्कार करत सानिया म्हणाली, ‘‘मी येथे माझ्या सासरी आले आहे. आम्ही दोघेही व्यावसायिक खेळाडू असल्यामुळे आम्हाला बराच काळ एकमेकांपासून दूर राहावे लागते, याचा अर्थ आम्ही आता वेगळे झालो आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. आमच्यावर खेळाचे दडपण असते. मात्र तरीही आम्ही चांगला संसार करत आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.’’
शोएबबरोबरच मी सियालकोट येथील माझ्या सासरी विश्रांती घेण्यासाठी आली आहे. युरोपातील स्पर्धापूर्वी मला विश्रांती आवश्यक होती म्हणूनच मी येथे आले आहे. येथे मी आवडत्या खाद्यपदार्थाचा स्वाद घेत असून बाजारहाट करण्याचा आनंद घेत आहे असे सांगून सानिया म्हणाली, ‘‘शोएबवर माझे खूप प्रेम आहे व त्याचेही माझ्यावर अतिशय प्रेम आहे. मात्र आम्हा दोघांना आमच्या व्यावसायिक बाजू सांभाळताना काही काळ एकमेकांपासून दूर राहावे लागत असते. आम्हा दोघांनाही आमच्या खेळात उज्ज्वल भवितव्य असल्यामुळे खेळास प्राधान्य देणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते.’’
पाकिस्तानला भेट द्यायला मला नेहमी आवडते. जर एखादी स्पर्धा तेथे आयोजित केली गेली तर त्यामध्ये भाग घ्यायला मला आवडेल. येथे सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक समस्या असल्या तरी माझे सासर येथे असल्यामुळे मला येथे भेट देणे अनिवार्य असते असेही सानिया म्हणाली. ती पुढे म्हणाली, मी जेव्हा येथे बाजारहाट करावयास जाते तेव्हा तेथील अनेक दुकानदार मी खरोखरीच सानिया मिर्झा आहे काय असा प्रश्न विचारतात व माझ्याकडून स्वाक्षरी मागतात. हा आनंद माझ्यासाठी खूपच वेगळा असतो.

Story img Loader