‘‘पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास स्वप्नपूर्ती होईल,’’ असे मत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले. मात्र, त्याच वेळी अपयश आल्यास थांबणार नाही. पुढील वाटचाल सुरूच ठेवणार असल्याचा सकारात्मक दृष्टिकोन सानियाने समोर ठेवला. सानियाने स्वित्र्झलडची जोडीदार मार्टिना हिंगिस हिच्यासह २०१५चे वर्ष गाजवले. गत आठवडय़ात या जोडीने डब्लूटीए फायनल टेनिस स्पध्रेत अजिंक्यपद मिळवत वर्षांतील नवव्या जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर मुंबईत दाखल झालेली सानिया मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत होती.
‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्व काही चांगले होईल, अशी आशा आहे. मी आणि लिएॅण्डर पेस मिश्र दुहेरीत पदक पटकावण्यात यशस्वी झालो, तर स्वप्न सत्यात उतरेल. मात्र, तसे न झाल्यास जग संपणार नाही,’’ असा पुनरुच्चार जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या सानियाने केला. भारताचे माजी डेव्हिस चषक स्पध्रेतील दिग्गज रमेश कृष्णन यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भारताला पदक पटकावण्याची संधी आहे, असा विश्वास व्यक्त केला होता.
सिंगापूरमध्ये डब्लूटीए फायनलचे जेतेपद पटकावल्यानंतर टेनिस दिग्गज मार्टिना नवरातिलोव्हाने सानियाचे कौतुक केले. त्यावर सानिया म्हणाली, ‘‘हा माझा सन्मान आहे. नवरातिलोव्हा मला म्हणाली की, टेनिसचा चेंडू मला फुटबॉलसारखा दिसतो.’’
खेळात आक्रमकता किती महत्त्वाची आहे, असे विचारल्यावर सानिया म्हणाली, ‘‘आपल्या लोकांचा स्वभाव कळेनासा झाला आहे. आक्रमक झालो तरी प्रश्न विचारले जातात आणि नाही झालो तरी. पण, माझ्या मते आक्रमकतेशिवाय खेळ होऊच शकत नाही. आक्रमकता असेल तरच यश मिळेल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा