आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग (आयटीपीएल)च्या निमित्ताने रॉजर फेडररसह खेळण्याची संधी मिळणार आहे. फेडररचा समावेश असलेल्या संघातून खेळणे हा अनुभव संस्मरणीय असेल, असे मत भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले. ‘‘फेडरर आधुनिक टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. जगभर त्याचे चाहते पसरले आहेत. आतापर्यंत टीव्हीच्या माध्यमातून त्याचा खेळ पाहण्याची संधी टेनिसरसिकांना मिळाली आहे. टेनिस लीगच्या निमित्ताने फेडररला ‘याचि देहा, याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. लीग स्वरूपाची स्पर्धा पहिल्यांदाच होणार आहे. भारतात लीग आधारित स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे टेनिस विश्वातला हा प्रयोगही लोकप्रिय होईल,’’ असा विश्वास सानियाने व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगचा तिसरा टप्पा दिल्लीत होणार आहे. या टप्प्यात भारतीय टेनिसरसिकांना फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स, अँडी मरे, पीट सॅम्प्रस या दिग्गजांना खेळताना पाहता येणार आहे. पुढच्या वर्षी महिला दुहेरीत ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकायचे आहे. जिंकण्याची ईर्षां कायम असेल तरच वाटचाल करता येते, असे सानियाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा