हैदराबाद : टेनिस कारकीर्दीला जेथून सुरुवात केली, त्याच हैदराबादमध्ये प्रदर्शनीय सामना खेळत भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या कारकीर्दीला रविवारी पूर्णविराम दिला.
हैदराबाद येथील लाल बदाहूर टेनिस कोर्टवर सानियाने रोहन बोपण्णा, युवराज सिंग, खास मैत्रीण बेथनी माटेक-सँड्स, इव्हान डोडिग, कॅरा ब्लॅक आणि मारियन बाटरेली यांसारख्या आपल्या लाडक्या सहकाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण लढती खेळल्या. याच कोर्टवर जवळपास दोन दशकांपूर्वी कारकीर्दीतील पहिले ‘डब्ल्यूटीए’ एकेरीचे विजेतेपद मिळवत सानियाने आपल्या उदयाची झलक दाखवली होती. त्यानंतर एकेरीत नाही, पण दुहेरीत सानियाने आपले वेगळे स्थान निर्माण केले.
सानियाची अखेरची सव्र्हिस पाहण्यासाठी केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू, माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, अनन्या बिर्ला, हुमा कुरेशी अशा प्रथितयश व्यक्तींबरोबर असंख्य चाहते, सानियाचे कुटुंबीय, सानिया मिर्झा अकादमीतील भावी खेळाडू यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. ‘‘कारकीर्दीच्या अखेरीस का होईना, पण पुन्हा तुमच्यासमोर खेळू शकले याचा मला आनंद आहे. घरच्या कोर्टवर आणि घरच्या चाहत्यांसमोर अखेरचा सामना खेळण्याची माझी इच्छा होती. तेलंगणा सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे आज ती पूर्ण झाली. तुम्हा सर्वाची मी आभारी आहे,’’ अशा भावना सानियाने व्यक्त केल्या.