अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळविणारी सानिया मिर्झा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेबाबत घूमजाव केले आहे. क्रमवारीतील गुणांसाठी आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत सानियाने दिले होते. मात्र तिने हा निर्णय बदलत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय टेनिस महासंघाने दोनच दिवसांपूर्वी सानियाला आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याची परवानगी दिली होती. सानिया हिचा आशियाई स्पर्धेतील सहभाग म्हणजे तिला वुहान येथे होणाऱ्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
सानिया म्हणाली, ‘‘आशियाई स्पर्धेत भाग घ्यावयाचा नाही, असा मी सुरुवातीला निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाबाबत मी समाधानी नव्हते. त्याची सल मला जाणवत होती. त्यामुळे मी माझा विचार बदलला व आशियाई स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले.’’ आशियाई स्पर्धेनंतर सानिया चीन खुल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Story img Loader