टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब मलिकने तुफान फटकेबाजी केली. ऐतिहासिक कामगिरी करत शोएब मलिक हा पाकिस्तानकडून सर्वात जलद अर्धशतक लगावणारा खेळाडू ठरला. अवघ्या १८ चेंडूंमध्ये शोएबने ५४ धावा केल्या. पाकिस्तान आणि स्कॉटलंडदरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि भारतीय टेनीसपटू सानिया मिर्झा मुलगा इजहान मिर्झा मलिकसहीत मैदनामध्ये उपस्थित होती. सामन्यादरम्यान अनेकदा सानिया आणि इजहान शोएबला प्रोत्साहन देताना दिसले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिक जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर आला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या १५ षटकांमध्ये ११२ धावा अशी होती. यावेळी पाकिस्तानचे तीन खेळाडू तंबूत परतले होते. यानंतर अवघ्या १८ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतक साजरं करत टी-२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक लगावणारा पाकिस्तानी खेळाडू होण्याचा मान मिळवला. मलिकने पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू निदा डारचा विक्रम मोडीत काढला. निदा डारने २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये २० चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

शेवटच्या दोन षटकांमध्ये शोएबने तुफान फटकेबाजी करत ८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. या खेळीमुळे पाकिस्तानची धावसंख्या २० षटकांमध्ये ४ बाद १८९ पर्यंत पोहचली. शोएबने आपल्या खेळीदरम्यान सहा षटकार आणि एक चौकार लगावला.

जेव्हा जेव्हा शोएबने षटकार लगावला तेव्हा तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेला त्याचा मुलगा इजहान आणि पत्नी सानिया यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. या दोघांच्या सेलिब्रेशन्सचे अनेक स्क्रीनशॉर्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी सानिया ही शोएबसाठी लकी चार्म असल्याचं म्हटलं आहे. सानिया मिर्झा जेव्हा जेव्हा शोएबची पाठराखण करण्यासाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर आली तेव्हा त्याने दमदार कामगिरी केलीय.

तर अन्य एकाने प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं आहे.

टी राईट्स इलेव्हनने शोएबच्या खेळीवरुन भारतीयांना टोला लगावताना,”सानिया मिर्झा ही उपांत्य फेरीमध्ये पोहचलेली एकमेव भारतीय आहे,” असं म्हटलंय.

तर माही नावाच्या एका युझरने तर थेट सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्यात हजर राहण्यासंदर्भातील याचिका दाखल करण्याची मजेदार मागणी केलीय. जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा सामना होईल तेव्हा सानियाने उपस्थित रहावं अशी याचिका आम्ही दाखल करणार आहोत असं या युझरने म्हटलंय.

पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय. त्याने पुरुषाच्या क्रिकेटमध्ये उमर अकमलचा विक्रम मोडलाय. उमर अकमलने २०१० साली ऑस्ट्रेलियाविरोधात एजबेस्टनमध्ये २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तर त्यानेच २०१६ मध्ये हॅमल्टनमध्ये २२ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.