भारताची सानिया मिर्झा व तिची स्विस सहकारी मार्टिना हिंगिस यांनी गतवर्षीच्या विजयाची परंपरा यंदाही पुढे सुरू ठेवली. त्यांनी ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील दुहेरीत अंतिम फेरी गाठली.
अव्वल मानांकित सानिया व मार्टिना यांनी आंद्रेजा क्लिपाक (स्लोवाकिया) व अ‍ॅल कुद्रियात्सेवा (रशिया) यांच्यावर ६-३, ७-५ अशी मात केली. कारकिर्दीतील त्यांचा हा २५वा विजय आहे. त्यांनी दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी एकदा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवताना फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांनी २०१२मध्ये सलग २५ सामने जिंकले आहेत. गिगी फर्नान्डेझ व नताशा जेव्हेरेवा यांनी १९९४ मध्ये सलग २८ सामने जिंकून विक्रम केला आहे. हा विक्रम मोडण्याची संधी सानिया व मार्टिना यांना आहे.
‘‘आम्हाला नवीन वर्षांची सुरुवात विजयाने करावयाची आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक सामन्यानुसार खेळाचे नियोजन करीत आहोत. गेल्या वर्षी आम्हाला खूप चांगले यश मिळाले होते. तीच परंपरा यंदा कायम ठेवायची आहे. सकारात्मक वृत्तीने खेळलो तर निश्चितच सर्वोत्तम कामगिरी होते, यावर माझा विश्वास आहे,’’ असे सानियाने सांगितले.
‘‘आम्ही एकत्रित सातत्याने भरीव कामगिरी करीत आहोत. त्याचे श्रेय आमच्या खेळात असलेल्या योग्य समन्वयास द्यावा लागेल. आमच्यात अतिशय सुसंवाद आहे. त्यामुळे एकमेकांच्या चुका सांभाळून आम्ही खेळतो,’’ असे हिंगिसने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा