भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरीचा नजराणा पेश करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सानिया-मार्टिना जोडीने जुलिया जॉर्जेस आणि कॅरलोलिना प्लिस्कोव्हा या जोडीचा ६-१, ६-० असा पराभव केला. सानिया-मार्टिना या जोडीचा हा सलग ३५वा विजय ठरला. अंतिम लढतीत सानिया-मार्टिना जोडीसमोर चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा व लुसी हॅरडेका यांचे आव्हान आहे.
भारताच्या रोहन बोपण्णाचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बोपण्णा आणि युंग जॅन चॅन या जोडीला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. स्लोव्हेनियाचा अँड्रेजा क्लेपॅक आणि फिलिपाइन्सचा ट्रिट हूय या बिगरमानांकित जोडीने तिसऱ्या मानांकित बोपण्णा व चॅन यांच्यावर अवघ्या ५५ मिनिटांत ६-२, ७-५ असा विजय मिळवला.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सानिया मिर्झा व लिएण्डर पेस हे आपापल्या जोडीदारांसह एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सानिया व तिचा क्रोएशियाचा जोडीदार इव्हान डॉडीग हे गुरुवारी लिएण्डर व त्याची स्वित्र्झलडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांच्याविरुद्ध खेळतील.
कनिष्ठ मुली गटात करमान कौर थंडी आणि प्रांजळा यडलपल्ली यांचे एकेरी व दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या सारा टॉमिकने ३-६, ७-५, ७-५ अशा फरकाने करमानला, तर प्रांजळाला रशियाच्या अॅनस्टासिया पोटापोव्हाने ५-७, ५-७ असे नमवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा