टेनिसरसिकांना वेगवान आणि खमंग टेनिसची पर्वणी देत इंडियन एसेस संघाने इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेत सुपर शूटआऊटमध्ये मनिला मॅव्हरिक्सला नमवत थरारक विजयाची नोंद केली. जो विलफ्रेड सोंगा आणि गेइल मॉनफिल्स या फ्रान्सकरांमध्ये झालेल्या सुपरशूटआऊटमध्ये मॉनफिल्सने १०-७ अशी बाजी मारत इंडियन एसेसला २६-२५ असा विजय मिळवून दिला. घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाला जागत इंडियन ऐसेसने दिल्लीत विजयी सलामी दिली.
पहिल्या दोन टप्प्यात जबरदस्त फॉर्मात असलेल्या सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. क्रिस्टिन फ्लिपकेन्स-डॅनिअल नेस्टर जोडीने सानिया-रोहन जोडीवर ६-५ असा विजय मिळवत मॅव्हरिक्सचे खाते उघडले. माजी खेळाडूंच्या लढतीतही इंडियन एसेस संघाची निराशाच झाली. प्रशिक्षक आणि खेळाडूच्या भूमिकेत असलेल्या फॅब्रिस सॅन्टेरोने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सॅड्रिक प्युलिनला संधी मिळाली. मात्र मार्क फिलीप्योनिसने प्युलिनवर ६-४ अशी मात केली. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी एसेसला या लढतीत विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. रोहन बोपण्णाने गेइल्स मॉनफिल्सच्या साथीने खेळताना जो विलफ्रेड सोंगा-ट्रेट ह्युये जोडीला ६-५ असे नमवले. सोंगाच्या सर्वागीण खेळाला मॉनफिल्सने टक्कर देत बोपण्णाच्या साथीने विजय साकारला. टायब्रेकरमध्ये गेलेल्या मुकाबल्यात बोपण्णा-मॉनफिल्स जोडीने ८-६ अशी बाजी मारली. सर्वाग झोकून देणाऱ्या फ्रान्सच्या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या लढतीत सोंगाने मॉनफिल्सला ६-४ असे नमवले. दोन्ही खेळाडूंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ३-३ अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर सोंगाने अचूक सव्र्हिसवर भर देत ६-४ अशी सरशी साधली. अंतिम आणि निर्णायक मुकाबल्यात इंडियन ऐसेसच्या अॅना इव्हानोव्हिकने मनिला मॅव्हरिक्सच्या क्रिस्टिन फ्लिपकेन्सवर ६-२ असा विजय मिळवला. या विजयासह इंडियन दोन्ही संघांचे २५-२५ गुण झाल्याने मुकाबला सुपर शूटआऊटद्वारे गेला.
दरम्यान शनिवारच्या पहिल्या लढतीत यंदाच्या वर्षांत ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई करणाऱ्या मारिन चिलीचच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर युएई रॉयल्सने इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या दिल्लीत विजयी सलामी दिली. पाचपैकी चार लढती जिंकत रॉयल्सने हा मुकाबला २९-१६ असा जिंकला. एकेरीच्या पहिल्या लढतीत रॉयल्सच्या चिलीचने स्लॅमर्सच्या ल्युटन हेविटचा ६-३ असा धुव्वा उडवला.ोुरुष दुहेरीच्या लढतीत चिलीचने नेनाद झिम्नोझिकच्या साथीने खेळताना स्लॅमर्सच्या ल्युटन हेविट-निक कार्यिगोस जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीचा विशेषज्ञ खेळाडू असणाऱ्या झिम्नोझिकने चिलीचच्या साथीने खेळताना आक्रमणावर भर देत विजय साकारला.
माजी खेळाडूंच्या लढतीत रॉयल्सच्या गोरान इव्हानिसेव्हिकने स्लॅमर्सच्या पॅट राफ्टरला ६-१ असे नमवले. मिश्र दुहेरीच्या लढतीत नेनाद झिम्नोझिक- क्रिस्तिना लाडेनोव्हिक जोडीने डॅनिएला हन्तुचोव्हा-निक कार्यिगोस जोडीचा ६-४ असा पराभव केला. अंतिम लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभव स्वीकारावा लागल्याने युएई रॉयल्सचे निर्भेळ विजयाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. डॅनिएला हन्तुचोव्हाने वोझ्नियाकीवर ६-५ अशी मात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा