क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सन्मानासाठी अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाची पुरस्कार समितीकडूनही शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या १७ खेळाडूंमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा (क्रिकेट) व अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) यांचा समावेश आहे.
महिलांच्या दुहेरीत सानिया ही जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू आहे. सानियाने स्विस खेळाडू मार्टिना हिंगिस हिच्या साथीत नुकतीच विम्बल्डन स्पर्धा जिंकून महिला दुहेरीतील ग्रँड स्लॅम कामगिरी पूर्ण केली. खेलरत्न पुरस्कार तिला मिळाला तर हा सन्मान मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू असेल. यापूर्वी लिअँडर पेसला हा मान मिळाला आहे. त्याने अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर त्याला हा किताब देण्यात आला होता.
२८ वर्षीय सानियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन (२००९), फ्रेंच ओपन (२०१२) व अमेरिकन ओपन (२०१४)या स्पर्धामध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपदे मिळविली आहेत. तिने खेलरत्न पुरस्काराबाबत स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लिकल, थाळीफेकपटू विकास गौडा, धावपटू टिंटू लुका, उदयोन्मुख बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग यांना मागे टाकले आहे. सानियाने २०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी व महिला दुहेरी या विभागात कांस्यपदक मिळविले आहे. तिला २००४ मध्ये अर्जुन पुरस्कार व २००६ मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या व निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सानियाची खेलरत्न किताबाकरिता शिफारस केली.
अर्जुनसाठी शिफारस केलेल्या रोहित शर्माने गतवर्षी श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची विक्रमी खेळी केली होती. तसेच त्याने सातत्याने एक दिवसीय फलंदाजीत चमक दाखविली आहे. अभिलाषाने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही चमकदार कामगिरी केली आहे.
ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण करणारा नेमबाज जितू राय आणि भारताचा गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांचीही या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. मनदीप जांगराने आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पदकांची कमाई केली आहे. बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन स्पर्धा जिंकल्या आहेत.
अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले खेळाडू
पी.आर.श्रीजेश (हॉकी), जितू राय (नेमबाजी), संदीपकुमार (तिरंदाजी), मनदीप जांगरा (बॉक्सिंग), बबिताकुमारी, बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), किदम्बी श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोईंग), सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग), संथोई देवी (वुशु), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एम.आर.पुवम्मा (अॅथलेटिक्स), मनजित चिल्लर, अभिलाषा म्हात्रे (कबड्डी), अनुपकुमार (रोलरस्केटिंग).