भारताच्या सानिया मिर्झाने जागतिक टेनिस क्रमवारीतील दुहेरीत अव्वल स्थान कायम राखले असून रोहन बोपण्णाने दुहेरीत नववे स्थान मिळविले आहे.
महिलांच्या दुहेरीत सानियाची सहकारी मार्टिना हिंगिसने दुसरे स्थान राखले आहे. सानियाचे ११ हजार ३९५ गुण झाले आहेत, तर मार्टिनाने ११ हजार ३५५ गुणांची कमाई केली आहे. या जोडीने सलग २६ सामने जिंकताना अमेरिकन ओपन, गुआंगझुओ, वुहान, बीजिंग, डब्ल्यूटीए व ब्रिस्बेन खुल्या टेनिस स्पर्धामध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये इटलीच्या सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांनी सलग २५ सामने जिंकले होते. त्यामध्ये त्यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेसह सलग पाच विजेतेपद मिळविली होती.
पुरुष गटात बोपण्णा या एकमेव भारतीय खेळाडूने पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान घेतले आहे. ब्राझीलच्या मार्सेलो मेलोने दुहेरीत अव्वल क्रमांक मिळविला असून होरिया तेकाकू (रुमानिया) व जीन ज्युलियन रॉजर (नेदरलँड्स) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.
एकेरीत युकी भांब्रीने ९५ वे स्थान मिळवले आहे. पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने अव्वल स्थान मिळविले आहे. इंग्लंडचा अँडी मरेने दुसरे स्थान घेतले
असून रॉजर फेडरर हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक टेनिस क्रमवारी : सानियाचे अव्वल स्थान कायम
भारताच्या सानिया मिर्झाने जागतिक टेनिस क्रमवारीतील दुहेरीत अव्वल स्थान कायम राखले
First published on: 12-01-2016 at 05:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza retains top spot in doubles rankings