यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या टेनिसपटू सानिया मिर्झाने वर्षांचा शेवट डब्ल्यूटीए टूर फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदाने केला. आता नव्या हंगामात तिने जागतिक क्रमवारीत दुहेरीचे अव्वल स्थान काबीज करण्याचे लक्ष्य जोपासले आहे.
‘‘टेनिसरसिकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या यशासाठी ते प्रार्थनाही करतात. ही भावनाच अतिशय सुखावणारी आहे. मी जे उद्दिष्ट निश्चित केले होते, त्याच्या नजीक पोहचले आहे. जागतिक क्रमवारीत दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्यासाठी मी प्रयत्नशील होते. २०१४मध्ये माझी कामगिरी लौकिकाला साजेशी झाली. मी या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. आता मला अव्वल स्थान खुणावते आहे. पुढच्या हंगामात हे उद्दिष्टही पार करेन,’’ असे सानियाने सांगितले.
काही दिवसांपूर्वीच सिंगापूर येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूर फायनल्स टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झाने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना जेतेपदाची कमाई केली. तत्पूर्वी तिने कॅराच्या साथीनेच खेळताना अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. याव्यतिरिक्त इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सानियाने मिश्र दुहेरीत सुवर्ण तर महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते.
‘‘या वर्षांतली कामगिरी सुरेख अशीच म्हणावी लागेल. एका हंगामात टेनिसपटूला जे साध्य करावेसे वाटते ते मी केले आहे. ग्रँडस्लॅम जेतेपद आणि त्याच्या जोडीला वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदाने आनंद द्विगुणित झाला आहे. विशेषत: कॅरा बरोबरची माझी ही शेवटची स्पर्धा होती. तिच्याबरोबरच्या शेवटच्या स्पर्धेत जेतेपद मिळवता आल्याने समाधान वाटते आहे,’’ असे सानियाने सांगितले.
या यशाचे रहस्य काय, असे विचारले असता सानिया म्हणाली, ‘‘अथक मेहनत! खेळात सुधारणा करण्यासाठी अविरत मेहनत करणे एवढेच मी केले. हा एका दिवसाचा चमत्कार नाही. गेली २१ वर्षे मी हा खेळ खेळते आहेत.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रशंसेबाबत सानिया म्हणाली, ‘‘पंतप्रधानांनी आपल्या कामगिरीची दखल घ्यावी ही भावनाच अद्भुत आहे. मी दोनदा त्यांना भेटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ते नेहमीच शुभेच्छा देतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळे क्रीडापटूंना प्रेरणा मिळते.’’
‘‘वादविवादातून बाहेर पडून खेळावर लक्ष केंद्रित करणे कठीण आहे. वादविवादांमुळेच मी कणखर झाले आहे. या गोष्टींमुळेच देशवासीयांचे माझ्यावर किती प्रेम आणि पाठिंबा आहे हे मला समजले,’’ अशा शब्दांत सानियाने टीकाकारांना प्रत्युतर दिले.
‘‘आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)च्या माध्यमातून टेनिसरसिकांना रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स अशा दिग्गजांचा खेळ ‘याचि देहा, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे देशातल्या टेनिसला चालना मिळेल,’’ असा विश्वास सानियाने व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा