एप्रिल २०१२ म्हणजे साधारण अडीच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पत्रकारांशी संवादाच्या अनौपचारिक कार्यक्रमात सानिया मिर्झाने एकेरी प्रकारात खेळणे बंद करणार असल्याचे सांगितले. फार आश्चर्य वाटण्यासारखी ही k06बातमी नव्हती. पण या निर्णयातच भविष्यातील वाटचालीचे बीज रुजलेले होते.
इतक्या वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेरीतील सानियाची कामगिरी उल्लेखनीय अशी नव्हती. एकेरीत झटपट गाशा गुंडाळावा लागत असतानाच दुहेरीत तिने सातत्यपूर्ण प्रदर्शनासह मेहनतीला यशाची, k03जेतेपदांची जोड दिली होती. त्यामुळे एकेरी सोडण्याचा निर्णय स्वाभाविक होता, मात्र कठोर होता. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या तिन्ही पातळ्यांवर एकेरीत खेळणाऱ्यांचा वारू भरधाव असतो. दुहेरीची मंडळी यश मिळवतात, नाव होते, पण स्थान दुय्यमच राहते. त्यामुळे दुहेरीत सुरेख कामगिरी होत असतानाही सानियाने एकेरी खेळणे सोडले नव्हते. एकेरीत प्राथमिक फेरीत आव्हान संपुष्टात येणारी सानिया दुहेरीत हमखास जेतेपदाचा चषक उंचावत असे. ‘दुधाची तहान ताकावर’ असा हा प्रकार सानियाने बरीच वर्षे जपला. मात्र २०१२च्या जानेवारी महिन्यात तिच्या गुडघ्यावर तिसरी शस्त्रक्रिया झाली. भावनिक होण्यापेक्षा व्यवहार्य विचार करण्याची वेळ खेळाडूच्या कारकिर्दीत येते. त्यावेळी अप्रिय वाटणारा निर्णय घ्यावाच लागतो व सानियाने तो घेतला.
एकेरी खेळण्यासाठी अफाट तंदुरुस्ती लागते. प्रतिस्पध्र्याची वेगवान सव्‍‌र्हिस परतवण्यासाठी कोर्टवर अथक पळावे लागते. फोरहँड आणि बॅकहँड या मूलभूत फटक्यांचा वापर करण्यासाठी खांदे, गुडघे, मनगटे आणि पर्यायाने संपूर्ण शरीराची साथ असणे अनिवार्य असते. सतत उद्भवणाऱ्या दुखापतींमुळे ही साथ आपल्याला नाही, हे तिसऱ्या शस्त्रक्रियेअंती सानियाच्या लक्षात आले. दुहेरीतही शरीराची साथ लागतेच, मात्र तुमचे कच्चे दुवे बळकट करण्यासाठी साथीदार असतो. भावनिक होऊन केवळ प्रतिष्ठेसाठी एकेरी खेळण्याचा मोह तिने आवरला आणि संपूर्ण लक्ष दुहेरीवर केंद्रित करायचे ठरवले. आणि त्याचे परिणाम जगासमोर आहेत. या अडीच वर्षांत ग्रँड स्लॅम जेतेपद तिच्या नावावर आहे. गेल्या वर्षांत विविध साथीदारांसह खेळताना सानियाने पाच जेतेपदांची कमाई केली. यंदाच्या वर्षांत झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना तिने तीन स्पर्धाच्या जेतेपदांवर कब्जा केला. वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या अव्वल आठ जोडय़ांनाच डब्ल्यूटीए वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळण्याची संधी मिळते. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सानिया-कॅरा जोडीने या स्पर्धेत खेळण्याचा मान पटकावला आणि जेतेपदाला गवसणी घालत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम जोडी असल्याचे सिद्ध केले. एवढे धवल यश मिळवल्यानंतरही सानिया-कॅरा पुढच्या वर्षी एकत्र खेळणार नाहीत. दुहेरीचे खेळाडू विशिष्ट कालावधी किंवा स्पर्धेसाठी सहकाऱ्याची निवड करतात. या हंगामाच्या शेवटी स्वतंत्र होण्याचे कॅराने ठरवले होते. कॅराच्या साथीने जेतेपदे आणि भरपूर विजय मिळवूनही तिच्या निर्णयाचा सानियाने आदर ठेवला. कॅरासोबतच्या यशस्वी भागीदारीचा शेवट जेतेपदाने झाला, यात समाधान मानले. या भागीदारीत गुंतण्याऐवजी नव्या हंगामात तैपेईच्या स्यु वेईच्या साथीने खेळण्याचे निश्चित केले आणि त्यासाठी तिची तयारीही सुरू झाली आहे.
क्रमवारीचे गुण आणि बक्षीस रक्कम बाजूला ठेवत सानियाने इन्चॉनला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या सानियाने साकेत मायनेनीच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्ण, तर प्रार्थना ठोंबरेच्या साथीने महिला दुहेरीत कांस्यपदकाची कमाई केली. आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असणाऱ्या युवा खेळाडूंचा खेळ, भावविश्व यांच्याशी जुळवून घेत, त्यांना मार्गदर्शन करत सानियाने दुहेरी जबाबदारी पेलली. या अडीच वर्षांत वादविवादांपेक्षा खणखणीत खेळासाठी आपले नाव घेतले जाईल, असा पण करत तिने आपल्या रॅकेटने जबाब दिला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी सानियाला पाकिस्तानची सून ठरवणाऱ्यांना तिने भारतासाठी आशियाई पदक पटकावत चपराक लगावली आहे. खेळाडू मोठा झाल्यानंतर त्याच्यावरील जबाबदाऱ्यांचा, अपेक्षांचा पसारा वाढतो. हे तत्त्व ओळखून युवा टेनिसपटू घडवण्यासाठी गेल्या वर्षी सानियाने हैदराबादमध्ये अकादमीची स्थापना केली आहे. एका छत्राखाली सर्वसमावेशक प्रशिक्षण उपलब्ध करून देणारे अकादमी प्रारूप गरजेचे आहे, हे जाणत तिने या अकादमीची उभारणी केली आहे.  

Story img Loader