आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरी प्रकारात भारताचा झेंडा फडकावणाऱ्या सानिया मिर्झाची क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम अशा ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत सानियाने मार्टिना हिंगिसच्या साथीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. याच वर्षी सानियाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती.
खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या निर्धारित वेळेत शिफारस करण्याची अखिल भारतीय टेनिस संघटनेची संधी हुकली. मात्र गेल्या वर्षभरातल्या सानियाच्या कामगिरीची नोंद घेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने याप्रकरणी पुढाकार घेत खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाच्या नावाची शिफारस करण्याचे निश्चित केले. क्रीडामंत्री सर्बानंदा सोनोवाल यांनी याप्रकरणी पुढाकार घेत सानियाच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केली. पुरस्कार कोणाला द्यायचा, याचा निर्णय पुरस्कार समिती घेईल, असे केंद्रीय क्रीडा सचिव अजित शरण यांनी स्पष्ट केले. मायकेल फरेरा आणि कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती पुरस्कारासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. विकास गौडा, टिंटू लुका, दीपिका पल्लिकल, देवेंद्र झझारिया, सरदार सिंग, अभिषेक वर्मा यांच्यासह ११ क्रीडापटू खेलरत्न पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.
सानियाला २००४मध्ये अर्जुन तर २००६मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. गेल्या वर्षी इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सानियाने साकेत मायनेनीच्या साथीने मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक, तर प्रार्थना ठोंबरेच्या साथीने खेळताना महिला दुहेरीच्या कांस्यपदकावर नाव कोरले होते. २०१४मध्येच अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने ब्रुनो सोरेसच्या बरोबरीने खेळताना मिश्र दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला होता.
दुखापतींवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या सानियाने युवा खेळाडू घडावेत यासाठी अकादमीही स्थापन केली आहे.
दरम्यान, क्रीडा क्षेत्रातल्या या सर्वोत्तम पुरस्काराच्या वितरणावरून २०१३मध्ये वाद निर्माण झाला होता. थाळीफेकपटू कृष्णा पुनियाने हा पुरस्कार न मिळाल्याबद्दल जाहीर नाराजी प्रकट केली होती. त्यावर्षी कृष्णाऐवजी नेमबाजपटू रंजन सोधीची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. गेल्यावर्षी खेलरत्न पुरस्कार कोणत्याही क्रीडापटूला देण्यात आला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा