पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. मलिकचा हा तिसरा विवाह आहे. शोएब मलिकने आपल्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताच ही बातमी अचानक चर्चेत आली. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला घटस्फोट न देताच या दोघांचा विवाह झाला का? सानिया आणि शोएबचं नातं संपुष्टात आलं का? असे प्रश्न दोन्ही देशातील त्यांचे चाहते उपस्थित करत होते. दरम्यान, मिर्झा मलिक या टीव्ही शोमधील त्यांचा एक जुना व्हीडियो व्हायरल झालाय. यामध्ये सानिया मिर्झा पत्नींबाबत होत असलेल्या चेष्टेवरून स्पष्टपणे बोलली आहे.
सानिया मिर्झाशी घटस्फोट न घेता शोएब मलिकने तिसरा विवाह केला आहे. त्यामुळे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले आहेत. या दोघांविषयी समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यादरम्यान, सानिया मिर्झाचा एक जुना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक पाकिस्तानमध्ये एक टीव्ही शो होस्ट करत होते. या शोमधील हा व्हीडिओ आहे.
हेही वाचा >> शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निर्णय…”
या टीव्ही शोमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाज आला होता. तो या कार्यक्रमात म्हणाला की, आम्ही जन्माला येतो. आम्हाला प्रेम मिळतं. त्यानंतर आम्हाला पालकांपासून ओरडा मिळतो आणि मग पत्नींपासून.” त्याच्या या विधानावर सानियाने चोख प्रत्युत्तर दिलं. “मला या शोमधील प्रत्येकाला सांगायचे आहे आणि मला वाटते की झैनबसुद्धा सहमत होईल. प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आवडता विषय त्यांच्या पत्नीची चेष्टा करणे हा आहे”, असं सानिया मिर्झा म्हणाली होती.
२०१० साली झाला होता विवाह
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे या दोघांचा विवाह संपन्न झाला होता. ऑक्टोबर २०१८ साली त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव इझहान मिर्झा मलिक असे ठेवण्यात आलेले आहे. मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही जाहीर वाच्यता केली नाही किंवा नात्यामधील तणाव बाहेर दाखवला नाही. त्यानंतर थेट शनिवारी शोएब मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना याची बातमी कळली.