लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा, सोमदेव देववर्मन या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये भारताची पदकाची झोळी रिकामी राहणार, अशी चर्चा होती. मात्र या सगळ्या शक्यतांना कामगिरीने खणखणीत उत्तर देत युवा टेनिसपटूंनी तब्बल पाच पदकांवर नाव कोरले. सोमवारी झालेल्या लढतींमध्ये अनुभवी सानिया मिर्झाने साकेत मायनेनीच्या साथीने खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. तत्पूर्वी झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत साकेत मायनेनी आणि सनम सिंग जोडीला पुरुष दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याने या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यांच्यासह पुरुष दुहेरीत युकी भांब्री-दिविज शरण (कांस्यपदक), महिला दुहेरीत सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे (कांस्यपदक), तर पुरुष एकेरीत युकी भांब्री (कांस्यपदक) अशा एकूण पाच पदकांवर भारताने वर्चस्व राखले.
मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीने तैपेईच्या ह्य़ुसेइन यिन आणि हाओ चिंग जोडीवर ६-४, ६-३ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला. पुरुष दुहेरीची प्रदीर्घ लढत खेळल्यानंतर मिश्र दुहेरीची लढत खेळणाऱ्या साकेतने सानियाला चांगली साथ दिली आणि या जोडीने पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तैपेईच्या जोडीने २-२ अशी बरोबरी केली. एक गुण पटकावत त्यांनी ३-२ अशी आघाडी घेतली. मात्र सुवर्णपदकाच्या जिद्दीने खेळणाऱ्या सानिया-साकेत जोडीने आपला खेळ उंचावत ५-३ अशी आघाडी मिळवली. मॅचपॉइंटद्वारे गुण मिळवत त्यांनी ऐतिहासिक पदकावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष दुहेरीमध्ये सनम सिंग आणि साकेत मायनेनी यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाच्या योंगक्यू लिम आणि हायइऑन चुंग जोडीने साकेत-सनम जोडीवर ७-५, ७-६ (२) असा विजय मिळवला. गुणवत्तेला जर चाहत्यांच्या प्रोत्साहनाची जोड असेल तर विजय मिळवणे जास्त कठीण होत नाही आणि याचाच प्रत्यय या सामन्यात आला. लिम आणि चुंग जोडीने एखादा गुण जिंकल्यावर त्यांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. लिम आणि चुंग जोडीने या सामन्यात फटक्यांच्या निवडीबरोबर चेंडू नेमका कुठे आणि कसा टोलवावा, याचा उत्तम वस्तुपाठ दाखवला. भारतीय जोडीनेही त्यांना चांगली लढत दिली. सामना अटीतटीचा झाला; पण भारताला मोक्याच्या क्षणी चांगला खेळ करण्यात अपयश आले.

Story img Loader